अमृता सिंह हिचा जन्म ९ फेब्रुवारी १९५८ मध्ये पाकिस्तानात झाला. आज अमृता तिच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर तिचा ६३ वा वाढदिवस साजरा करत आहे. अमृताच्या वाढदिवसानिमित्तानं तिची आणि सैफच्या लव्हस्टोरीला कशी सुरुवात झाली हे जाणून घेऊ या…
अशी झाली पहिली भेट
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात कशी झाली याबद्दल फार कुणाला माहिती नाही. सैफ आणि अमृताची पहिली भेट १९९२ मध्ये झाली. त्यावेळी सैफ अभिनयाच्या क्षेत्रात नवखा होता. तर अमृता प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती.सैफनं बेखुदी सिनेमातून अभिनयाच्या विश्वात पदार्पण केलं. या सिनेमाचं दिग्दर्शन राहुल रवैल करत होता. राहुल हा अमृताचा जवळचा मित्र आहे. बेखुदी सिनेमातील कलाकारांनी अमृताबरोबर फोटोशूट करावं अशी राहुल यांची इच्छा होती. तसं फोटोशूट करण्यात आलं, त्यावेळी अमृता आणि सैफ यांची पहिली भेट झाली. या फोटोशूटवेळी सैफ अमृताच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी अमृताला त्याचा राग आला नाही तर त्याचा गोडवा तिच्या मनाला भावला. इतकंच नाही तर अमृता त्यावरून सैफला चिडवत होती. फोटोशूटनंतर अमृताला सैफ आवडू लागला. तिच्या मनात सैफनं खास जागा निर्माण केली. त्यानंतर काही दिवसांत सैफनं अमृताला फोन करत डिनरसाठी आमंत्रित केलं. सैफचं हे आमंत्रण ऐकून अमृताला आश्चर्याचा धक्का बसला. तिनं सैफचं आमंत्रण स्वीकारलं. परंतु बाहेर कुठंही जेवायला न जाता सैफला तिनं तिच्या घरीच जेवायला आमंत्रित केलं.
सैफला आवडला अमृताचा साधेपणा
सैफनं अमृताचं हे म्हणणं लगेचच मान्य केलं. तो अमृताच्या घरी डिनरला गेला. त्यावेळी अमृता सर्वसामान्य मुलींसारखीच होती. तिनं कोणताही मेकअप केलेला नव्हता. जेव्हा सैफनं अमृताला या रुपात पाहिलं तेव्हा तिचा साधेपणा अधिकच भावला. या प्रसंगानंतर सैफ आणि अमृता एकमेकांच्या प्रेमात पडले.
अमृताकडून घेतले १०० रुपये उसने
या डिनरनंतर सैफला सिनेमाच्या चित्रीकरणासाठी जायचं होतं. परंतु त्याच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे अमृताकडून त्यानं १०० रुपये उधार घेतले होते. अमृता आणि सैफच्या या भेटीनंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु या लग्नाला सैफच्या घरच्यांची अजिबात परवानगी नव्हती.. त्यामुळे या दोघांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं. सैफ-अमृताचं लग्न झालं तेव्हा ती ३३ वर्षांची तर सैफ २१ वर्षांचा होता. त्यावेळी त्यांचं लग्न त्यांच्या वयातील अंतरामुळे खूप गाजलं होतं. यादोघांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुलं आहेत. लग्नानंतर काही वर्षे खूप चांगली गेली. परंतु कालांतरानं त्यांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाला आणि अखेर हे दोघं विभक्त झाले.