मुख्य आणि हार्बर मार्गावरील प्रथम श्रेणीच्या डब्यात तिकीट तपासणी करताना टीसीशी अनेक प्रवासी हुज्जत घालत असल्याच्या तक्रारी टीसीच्या आहेत. अनेकदा हे वाद विकोपाला जातात. हे रोखण्यासाठी लोकलमधील उद्घोषणा यंत्रणेतून माहिती देण्यात येत आहे.
लोकलमध्ये विशेषत: प्रथम श्रेणीतील प्रवाशांकडून टीसीवर आक्षेप नोंदवला जातो. टीसींना केवळ रेल्वे स्थानकांवर तिकीट तपासण्याची मुभा आहे, असा वाद घातला जातो. मात्र असा कोणताही नियम नसून टीसी लोकलमधील डब्यातही तिकीट तपासू शकतात, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच प्रवासी आणि टीसी यांच्यामधील वाद टाळण्यासाठी जनजागृतीपर उद्घोषणा लोकलमध्ये करण्यात येत आहे. प्रवाशांनी टीसींना सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.