सातत्यानं दानधर्म करतोस; त्याची वाच्यता करत नाहीस? स्वप्नील म्हणतो, चॅरिटी मी माझ्या…

० ‘वाळवी’च्या यशाचं श्रेय कुणाला देशील?
– ‘वाळवी’च्या यशाचं प्राथमिक श्रेय हे दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचं आहे. कथेत त्यांना मी दिसलो. परेश दिग्दर्शक आहे म्हटल्यावर नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. वरवर पाहता, चित्रीकरणाच्या दृष्टीनं हा सिनेमा सोपा वाटतो; पण तसं नाही. प्रत्येक फ्रेम महत्त्वाची आहे. सिनेमातला एखादा प्रसंग काढला, तर पूर्ण सिनेमा कोसळेल. माध्यम प्रतिनिधी, समीक्षक आणि प्रेक्षकांचंही मला कौतुक वाटतं; कारण कुणीही सिनेमाचा शेवट सांगितला नाही. सस्पेन्स फोडण्याची चढाओढ दिसली नाही. प्रेक्षकांनी हा सिनेमा मोठा केला.

० आजच्या मराठी सिनेविश्वाच्या स्थितीबद्दल तुझं मत काय?
– महाराष्ट्रात मराठी सिनेमाला स्क्रीन्स मिळाव्यात हा आग्रह धरावा लागतो, हाच मुळात विचार करण्याचा विषय आहे. कोणत्याही कलेत ‘चांगलं’ हा ‘सापेक्ष’ भाव आहे. एखाद्याला एखादा सिनेमा आवडेल, तर दुसऱ्याला तो कदाचित आवडणार नाही; त्यामुळे प्रेक्षकांनी सिनेमा पाहून आपल्या आवडीनुसार दुजोरा द्यावा. हिंदीतही तीनशे सिनेमे बनतात. त्यातील पाच प्रचंड चालतात. दाक्षिणात्य राज्यांमधील निवडक सिनेमेच प्रेक्षक डोक्यावर घेतात. मराठीतही असंच चित्र आहे.

० पुन्हा मालिका करण्याचं कारण काय?
– मी अभिमानानं सांगतो, की मी टीव्ही या माध्यमाचं बाळ आहे. प्रेक्षकांनी मला सर्व माध्यमांमध्ये स्वीकारलंय. सगळ्या माध्यमांमध्ये मी काम करू शकतो याचं श्रेय प्रेक्षक, लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार आणि संहिता या सगळ्यांना आहे. प्रत्येक माध्यमाची बलस्थानं वेगवेगळी आहेत. टीव्ही जे देऊ शकतं, ते सिनेमा देऊ शकत नाही.


० तू उत्तम लिहितोस. सातत्यानं दानधर्म करतोस; पण त्याची वाच्यता करता नाहीस. असं का?
– ज्या गोष्टी आपण स्वत:साठी करतो, त्या विषयी मला वाच्यता करायला आवडत नाही. लेखन आणि चॅरिटी या त्यापैकीच दोन गोष्टी. मी कविता, लेख, कथा लिहितो. यातून माझ्या भावनांचा निचरा होतो. चॅरिटी मी मन:शांती आणि माझ्या मुलांसाठी करतो. मी केलेल्या दानधर्माचं पुण्य माझ्या मुलांना मिळावं, असं वाटतं.

० ओटीटी माध्यमाविषयीचा तुझा दृष्टिकोन काय?
– ओटीटी माध्यम हे मनोरंजनाचं सक्षम माध्यम आहे; पण म्हणून नाटक, सिनेमा, टीव्ही या माध्यमांचं महत्त्व कमी होणार असं अजिबात नाही. ते तसंच राहणार आहे. प्रत्येक माध्यम आपापल्या जागी चोख आहे. कलाकार आणि व्यावसायिक म्हणून ‘वन ओटीटी’ या प्लॅटफॉर्मवर मी आणि माझी टीम सध्या काम करतोय. त्यावर आम्ही विविध प्रादेशिक भाषांमधील कलाकृती आणणार आहोत; त्यामुळे कलाकृती आणि प्रेक्षक यांच्यात देवाणघेवाण होईल.

निकष बदलतात
मराठी प्रेक्षकांचा मराठी सिनेमाकडे आणि इतर भाषेतील सिनेमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. प्रेक्षक मराठी सिनेमासाठी वेगळे निकष लावतो. जे प्रेक्षक दुसऱ्या भाषेतील सिनेमाचं कौतुक करतात. तसा सिनेमा मराठीत बनवल्यावर त्या प्रेक्षकांच्या ते पचनी पडत नाही. दुसऱ्या भाषेतील सिनेमांच्या संवादात शिवीगाळ चालते; पण मराठीत कथानकाची गरज असतानाही संवादात शिवी आल्यावर प्रेक्षक भुवया उंचावतात. भावना दुखावल्या जातात.


मराठी माणूस धंदा करू शकतो
मराठी माणूस धंदा करू शकत नाही असं बोललं जातं; पण आजची परिस्थिती वेगळी आहे. अनेक मराठी तरुण विविध स्टार्टअप, व्यवसाय करत आहेत. आपल्याकडे हरण्याला अवाजवी महत्त्व दिलं जातं; पण जो काही तरी करण्याचा प्रयत्न करतो, तोच चुकतो हे लक्षात घेतलं पाहिजे; त्यामुळे आपण प्रयत्नशील राहून नवनव्या गोष्टी करायला हव्यात. चुकांमधून माणूस शिकत असतो.

‘मी स्वप्नील जोशी नाही’
थोडं तात्त्विक वाटेल; पण मी असं मानतो की, मी स्वप्नील जोशी नाही. मी ‘अभिनेता स्वप्नील जोशी’साठी काम करणारा एक नोकरदार आहे. तो त्याच्या बायको आणि मुलांना घेऊन त्याच्या आई-वडिलांच्या घरी राहतो. तो अभिनेता स्वप्नील जोशी मला सकाळी बोलावतो आणि सांगतो, ‘आज तू डॉक्टर आहेस. हे तुझे कपडे, हे तुझे संवाद.’ तो स्वप्नील जसं सांगेल, तसं मी दिवसभर काम करतो. रात्री घरी आल्यावर आजही मला किमान एक तरी घरचं काम करावं लागतं. हा देखावा नसून, मराठी घरातील संस्कार आहेत.



Source link

swapnil joshiswapnil joshi interviewswapnil joshi interview in marathiswapnil joshi lifeswapnil joshi on charityswapnil joshi personal lifeswapnil joshi Vaalvi movieVaalvi movieस्वप्नील जोशी
Comments (0)
Add Comment