कमळ फुलविण्यासाठी कोल्हापूरचा जावईच मैदानात; अमित शहांची फिल्डींग, पश्चिम महाराष्ट्र टार्गेट

कोल्हापूर: शेजारच्या सांगली आणि सोलापुरात सतत कमळ फुलत असताना कोल्हापूरच सतत अपवाद ठरत असल्याने आता जिल्ह्यात लोकसभेच्या दोन्ही जागांवर कमळ फुलविण्यासाठी दस्तुर खुद्द अमित शहा हेच मैदानात उतरणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री असलेले शहा हे कोल्हापूरचे जावई असल्याने सासरी भाजपची ताकद वाढविण्यासाठी त्यांनी फिल्डींग लावली आहे. त्यासाठी १९ फेब्रुवारी रोजी ते कोल्हापुरात येत असून त्या दिवशी ‘ मिशन कमळ’चा नारा दिला जाणार आहे.

गेल्या पंचवीस-तीस वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर कमळ फुलविण्यासाठी पक्षाने जंग जंग पछाडले. पण येथे एकदाही भाजपचा अधिकृत उमेदवार विजयी झाला नाही. पण २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. मित्रपक्ष विजयी झाला, पण त्याने तातडीने संगत सोडली. त्यामुळे या विजयाचा आनंद भाजपला फार काळ साजरा करता आला नाही. अडीच वर्षाने शिंदे गटाच्या रूपाने शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने हे दोन्ही खासदार भाजपच्या जवळ आले. पण त्यांच्यावर शिंदे गटाचा शिक्का असल्याने भाजपचे काय हा प्रश्न कायम राहिला.

सांगली आणि सोलापुरात सतत भाजपला यश मिळत आहे. पण कोल्हापूर त्याला अपवाद ठरत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुरात कमळ फुलविण्याचा निर्धारच पक्षाने केला आहे. त्यासाठी कोल्हापूरचे जावई असलेले गृहमंत्री शहा सक्रीय झाले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका त्यामध्ये महत्त्वाची ठरत आहे. शहा यांच्या सौ. सोनल या कोल्हापूरच्या. त्या ज्या शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी आहेत, त्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने शहा कोल्हापुरात येत आहेत, पण सोबत राजकीय अजेंडाही निश्चित करण्यात आला आहे.

सासरवाडीत कमळ फुलविण्यासाठी शहा हे १९ फेब्रुवारी रोजी रणशिंग फुंकणार आहेत. त्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा बोलविण्यात आला आहे. पक्षाच्या नूतन कार्यालय परिसराची पाहणी करतानाच बुथ आणि शक्तीप्रमुखांची बैठक घेऊन ‘मिशन कमळ’ चा नारा देण्यात येणार आहे. सध्याचे दोन्ही खासदार शिंदे गटाचे असले तरी निवडणुकीत त्यांच्या हातात कमळ दिला जाणार हे जवळजवळ निश्चित आहे. त्या दृष्टीने सध्या पावले पडत आहेत. केवळ कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र टार्गेट करून पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी शहा हे कार्यकर्त्यांना उर्जा देणार आहेत.

राज्यसभेत कमळ, आता प्रतिक्षा लोकसभेची

धनंजय महाडिक यांच्या रूपाने कोल्हापुरात कमळ फुलले. पण ते राज्यसभेत. यामुळे आता कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात भाजपचा खासदार निवडून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्या जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार नाही. ती संख्या वाढविण्यासाठीही फिल्डींग लावण्यात येत आहे. या दृष्टीने शहा यांचा दौरा पक्षाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

Source link

amit shah on kolhapur visitKolhapurKolhapur newsunion home minister amit shahअमित शहाअमित शहा कोल्हापूर दौरा
Comments (0)
Add Comment