एकात्मता
सामान्य जनतेच्या हिताचे ठोस निर्णय घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, हे नागरी सेवकाचे मुख्य काम आहे. हा निर्णय घेताना तो सार्वजनिक हिताचा निर्णय असावा. त्यात कोणत्याही घटकाला अधिक फायदा किंवा एखाद्या घटकाला नुकसान होता कामा नये. तसेच एखादा निर्णय घेताना वैयक्तिक, कौटुंबिक किंवा मित्रपरिवाराच्या फायद्याचा विचार करू नये. आपल्या कार्यकाळात निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. कारण नुसतेच निर्णय घेऊन देखील फायदा नसतो.
नि:पक्षपातीपणा
हा नागरी सेवकाचा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अगदी साधी रजा देण्यापासून पदोन्न्ती देण्यापर्यंत, किंवा प्रसंगी कठोर कारवाई करतांना देखील नागरी सेवक निःपक्षपाती असायला हवा. बाहेरील संस्थांना कामाची कंत्राटे देताना ती केवळ गुणवत्तेच्या आधारावर द्यावित. त्यात कसूर झाल्यास प्रसंगी योग्य ती कारवाई करावी. राजकीय नेत्यांना एखादा मुद्दा उलगडून सांगताना किंवा वरिष्ठांशी सल्लामसलत करताना मुद्देसूद निःपक्षपाती चर्चा करावी. हा गुण अंगी असेल तर वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात मोठा आदर मिळवून देणारा असतो.
निरपक्षाभिमानी
लहानपणापासून घडलेल्या संस्कारामुळे म्हणा किंवा वैचारिक जडघडणीमुळे म्हणा प्रत्येक व्यक्ती कोणत्या तरी राजकीय विचारसरणीकडे झुकलेली असते. नागरी सेवक झाल्यानंतर मात्र कोणत्याही एका राजकीय विचारसरणीशी किंवा पक्षाशी लागेबंधे असणे हे धोकादायक असते. प्रत्यक्ष सेवेत असताना रोजच्या व्यवहारात, वागणुकीत, निर्णयप्रक्रियेत एका राजकीय विचारसरणीकडचा कल दिसता कामा नये. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाला बळी पडू नये. आपले मत, सल्ला, निर्णय प्रामाणिकपणे सांगावा.
वस्तुनिष्ठता
सार्वजनिक क्षेत्रात वावरतांना वस्तुनिष्ठता हा अत्यंत महत्त्वाचा गुण अंगी बाणवावा लागतो. नागरी सेवकाला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या स्तरातले, वेगवेगळ्या भागातले लोक भेटायला येतात. त्यांच्या विविधांगी समस्या असतात. ज्या प्रदेशात तो आपली सेवा देतो त्या प्रदेशाच्या वेगळ्या समस्या असतात. अशा वेळी सर्वसमावेशक निर्णय घेताना सेवकाच्या स्वभावगुणांचा कस लागतो. पण त्यात वस्तुनिष्ठता ही केंद्रस्थानी असते. कोणत्याही भावभावनांना, प्रलोभनांना बळी न पडता नेतृत्व करणे हे आव्हानात्मक काम असते. कधी कधी या वस्तुनिष्ठतेचा अतिरेक होऊन निष्ठुरता येण्याची शक्यता असते. पण तसे होऊ देणे देखील धोकादायक असते. त्यामुळे तथ्ये व अंतिम ध्येय यात समतोल साधावा लागतो.
आदर्शवाद
एखाद्या सनदी अधिकाऱ्याची १० वर्षांच्या सेवेत आठ बदल्या अशा प्रकारच्या बातम्या आपण वाचत असतो. बहुतांश वेळा हा सनदी अधिकारी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडत नाही. त्याला भ्रष्टाचाराची चीड असते. अतिशय कडक शिस्तीचा तर तो असतोच. पण दुसरीकडे कधी कधी टोकाचा आदर्शवाद देखीला कामाचा नसतो. जास्त बदल्या म्हणजे चांगला अधिकारी हे समीकरण सध्या रुजू होत आहे. पण नागरी सेवक हा आपल्या कामानी ओळखला जावा. त्यानी राबवलेल्या एखाद्या कल्याणकारी योजनेचा समाजाला बऱ्याच काळापर्यंत उपयोग झाला तर तो अधिकारी जास्त लक्षात राहतो. नागरी सेवा करताना समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन जावे लागते. त्यासाठी टोकाचा आदर्शवाद देखील चालत नाही.
वर उल्लेख केलेल्या गुणांसोबतच सेवाभावाची जोड तर हवीच. अन्यथा बाकी सर्व गुण व्यर्थ आहेत.
– रोहन नामजोशी (लेखक स्पर्धा परीक्षा तज्ञ आहेत)