वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय?
मनसे नेते वसंत मोरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला एक प्रश्न असल्याच म्हटलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या दोन आमदारांचं नुकतंच निधन झालं. तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या, असं वसंत मोरे यांनी सरकारला म्हटलं. मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे, असं वसंत मोरे म्हणाले.
विकास कामे ठप्प झाली आहेत निधी नसल्यामळे नागरिकांना भेटू वाटत नाही, असंही वसंत मोरे म्हणाले. पुण्यातील आमदार खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पाहावे आणि हो जर कोणत्या पक्षाला सहनुभुती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असताल तर तुमचा पराभव निश्चित समजा कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार, असंही वसंत मोरे म्हणाले.
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे आग्रही
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळं लांबणीवर पडल्या आहेत. सुरुवातीला ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा आणि आता प्रभाग रचना बदलण्याची राज्य सरकारची भूमिका यामुळं स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. महाराष्ट्रातील नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. राज्यातील विविध महापालिकांमध्ये प्रशासकांकडून कारभार सुरु आहे त्याला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता निवडणुकांचा मुद्दा उचलला आहे. मनसेकडून मुंबई पाठोपाठ पुण्यातही महापालिका निवडणुकांचा मुद्दा उचलण्यात आला आहे.