सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील यपावाडी गावच्या येताळा चव्हाण या वयस्कर शेतकऱ्याने वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यां सोबतच इंग्रजी भाषेत संवाद साधत आपली कैफियत मांडली होती. या वयस्कर शेतकऱ्यास अखेर न्याय मिळाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांची तात्काळ विजेची जोडणी करून देत शेतकरी येताळा चव्हाण यांच्या भावनेला साद घातली आहे. याबद्दल चव्हाण यांनी महावितरणचे अधिकारी पवार आणि बालटे यांचं अभिनंदन केलं आहे.
आटपाडी तालुक्यामध्ये महावितरणच्यावतीने वीज चोरीला आळा घालण्यासाठी वीज चोरी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकांच्या माध्यमातून शेतीच्या विद्युत पंपासाठी वीज चोरी होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले होते. वीज चोरी पकडण्यासाठी यमाजी पाटलांची वाडी याठिकाणी पथक गेले होते. यावेळी सहायक अभियंता सुनील पवार यांना वयस्कर शेतकरी येताळा चव्हाण यांनी विद्युत पंपासाठी वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले.
अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांचे सर्व साहित्य जप्त करत असल्याचे सांगितले. यावेळी शेतकरी चव्हाण यांनी अधिकाऱ्यांशी चक्क इंग्रजी मधून बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी तुम्ही कायदेशीर कारवाई करा मला काही अडचण नाही. माझे वकील तुम्हाला त्याचे उत्तर देतील, असे सांगतच जागेवरच वीज कनेक्शन देण्याची मागाणी केली. त्यांचे हे इंग्रजीतील संभाषण सोशल मीडियीवर व्हायरल झाले होते.
सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील यपावाडी गावातील आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी इंग्रजीत संवाद साधणारे शेतकरी येताळा चव्हाण यांचे शेतीपंपाचे वीज कनेक्शन आज महावितरणकडून जोडून देण्यात आले आहे. वीज तोडणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांशी शेतकरी येताळा चव्हाण यांनी वीज जोडणी बाबतची व्यथा इंग्रजीत बोलून मांडली होती.
वृद्ध शेतकरी चव्हाण यांचा इंग्रजी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. रातोरात सोशल मीडियावर चव्हाण यांच्या व्हिडिओचा बोलबाला झाला,यावरून महावितरण कंपनीला ट्रोल देखील करण्यात आले होते. अखेर महावितरण कंपनीकडून चव्हाण यांची वीज कनेक्शन जोडण्यात आले आहे,त्याच बरोबर त्यांचा सत्कार देखील वीज वितरण कर्मचाऱ्यांनी केला आहे.