हायलाइट्स:
- महाराष्ट्रातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या जोरदार हालचाली पक्षात सुरू.
- यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार आहे.
- यामुळे सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षात राजकीय हालचालींना वेग.
गुरुबाळ माळी, कोल्हापूर
महाराष्ट्रातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या जोरदार हालचाली पक्षात सुरू आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार आहे. यामुळे सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विक्रम सावंत, सिद्धराम म्हेत्रे, गुलाबराव घोरपडे व… यांची नावे कारभारी म्हणून नियुक्तीच्या अंतिम टप्प्यात आहेत. (the congress party is in the process of changing the district presidents)
राज्यातील काँग्रेसी सूत्रे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांच्या हातात आल्यानंतर राज्यातील पदाधिकारी बदलाच्या हालचालींना वेग आला. पण मध्यंतरी याबाबतच्या हालचाली काही प्रमाणात मंदावल्या. आता पुन्हा नव्याने बदलाचे वारे वाहू लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील जवळजवळ २५ शहर व जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार आहेत. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रात प्रत्येकी पाच तर विदर्भातील सहा पदाधिकारी बदलताना नवीन चेहऱ्यांना ती संधी देण्यात येणार आहे. मराठवाड्यातीलही काही चेहरे बदलले जाणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात पक्षात बदल करण्यात येणार असल्याने पक्षातही उत्साह वाढला आहे.
क्लिक करा आणि वाचा- खावाले काळ, नि भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार; शेलारांचे टीकास्त्र
राज्यात स्वबळावर आगामी निवडणूक लढविण्याची सतत घोषणा करणाऱ्या पटोले यांना पक्षात नवी टिम तयार करायची आहे. त्यासाठी त्यांनी राज्यातील तालुका अध्यक्ष व ब्लॉक कमिटीच्या प्रमुखांशी चर्चा करून त्या त्या जिल्ह्यात नवीन पदाधिकारी कोण असावा याची माहिती घेतली. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील इच्छुकांची यादी तयार करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात या यादीला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाध्यक्षांची नावे घोषित करण्यात येतील.
सांगलीचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांच्या जागी आमदार विक्रम सावंत अथवा विशाल पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सावंत जिल्हाध्यक्ष झाल्यास पाटील यांना प्रदेश कार्यकारिणीवर बढती देण्यात येणार असल्याचे समजते. सोलापूरचे जिल्हाध्यक्ष म्ह्णून माजी राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे व सुरेश हातापुरे यांची नावे आघाडीवर आहेत. यामध्ये म्हेत्रे यांनाच संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
क्लिक करा आणि वाचा- गडकोट संवर्धन हवे, पर्यटन, महसूल नको; खासदार संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांना विनंती
कोल्हापूरचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे जबाबदारी आहे. पण ते मंत्री झाल्याने राज्याचा व्याप त्यांच्याकडे आल्याने ते आता जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी इतरांकडे देण्याची शक्यता आहे. त्यांनी दोन तीन वर्षात पक्षाला जिल्ह्यात नवसंजीवनी दिल्याने ते म्हणतील त्याच्याच गळ्यात पदाची माळ मिळणार हे नक्की आहे. नवीन जिल्हाध्यक्ष म्ह्णून गुलाबराव घोरपडे, दिलीप पाटील, सदाशिव चरापले, उदय पाटील कौलवकर, शंकरराव पाटील यांची नावे चर्चेत आहेत. जिल्हाध्यक्षाबरोबरच शहराध्यक्षही बदलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यासाठी सध्या सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, दिलीप पोवार व आनंद माने हे स्पर्धेत आहेत. सातारा जिल्ह्याचे पक्षाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून सुरेश जाधव यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. आपल्यालाच पूर्णवेळ कार्यभार मिळावा म्ह्णून ते प्रयत्नशील आहेत.
क्लिक करा आणि वाचा- ठाण्यासाठी करोनाची नवी नियमावली जाहीर; पाहा, कुठे मिळाला दिलासा!
जिल्हा व संभाव्य जिल्हाध्यक्ष
कोल्हापूर- गुलाबराव घोरपडे, उदय पाटील कौलवकर
सांगली- विक्रम सावंत, विशाल पाटील
सोलापूर- सिद्धराम म्हेत्रे, सुरेश हातापुरे
सातारा- सुरेश जाधव, विजयराव कणसे