आयआयटीसह एनआयटी, ट्रीपल आयटीसाठी बारावी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांची तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ६५ टक्क्यांचे निकष कोविडनंतर पूर्ववत करण्यात आले. कोविडच्या काळात निकषांमध्ये शिथिलता आणण्यात आली होती. निकष पूर्ववत करण्यात आल्यानंतर शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला महत्व प्राप्त झाले. जेईईच्या परीक्षेप्रमाणेच बारावी शिक्षण मंडळाच्या परीक्षेकडे विद्यार्थ्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. निकषांमधील बदलाची माहिती मिळाल्यावर विद्यार्थ्यांनी त्यादृष्टीने बारावी परीक्षेसह एप्रिलमध्ये होणाऱ्या सत्र-२ची तयारी सुरु केली आहे.
देशातील नामांकीत भारतीय तंत्रज्ञान संस्थांसह, एनआयटी, ट्रीपल आयटी, सीएफटीआयमधील प्रवेशासाठी कोविडमध्ये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गुणांच्याबाबतीत असलेल्या निकषांमध्ये सुट देण्यात आली होती. तीन वर्षानंतर निकष पूर्ववत करण्यात आले आहेत. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याला ७५ टक्के तर मागासप्रवर्गातील विद्यार्थ्याला ६५ टक्क्यांची अट आहे. जेईई मेनसह आता विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेवरही लक्ष केंद्रीत केले आहे.
उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये त्या दृष्टिकोनातून तयारी करून घेतली जात आहे. शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. यासह एप्रिलमध्ये जेईई मेन सत्र २ची परीक्षा असणार आहे. सेशन वनमध्ये विद्यार्थ्यांना सर्वसाधारण गुण मिळाले असल्याचे तज्ज्ञांना वाटते. अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविले ते विद्यार्थी सेशन २ ला सामोरे जाणार नाहीत असे सांगण्यात येते.
परंतु बहुतांशी विद्यार्थी एप्रिलमध्ये होणाऱ्या जेईई मेनचीही तयारी करत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. मागील दोन वर्ष महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष तासिका सुरु नसल्याने विद्यार्थ्यांचा सराव कमी झाला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना अडचणीही येत असल्याचे सांगण्यात येते. बारावी परीक्षाही २०२०प्रमाणे नियमित पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची दोन्ही परीक्षांच्या दृष्टीकोनातून तयारी सुरु आहे.
बारावीत ७५ टक्के गुणांची अट ही पूर्वी होती. फक्त करोनाकाळात त्यात सवलत दिली होती. ती आता यंदाच्या परीक्षेत पुन्हा जैसे थे केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच बारावीत ७५ टक्के गुण अनिवार्य असेल. मेन्समध्ये भाग-१मध्ये २० प्रश्न विचारले जातात. त्याला निगेटिव्ह मार्किंग असते. तर भाग-२ मध्ये दहा प्रश्न विचारले जातील त्या पैकी पाच सोडवायचे आहेत. पण यांना निगेटिव्ह मार्क नाहीत आणि पर्यायी उत्तरे नसतात.
आर. बी. गरुड, माजी प्राचार्य
..
पत्रामुळे विद्यार्थ्याना शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेच्या तयारीला विद्यार्थ्यांना वेळ द्यावे लागेल. निकषाबाबत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला स्पष्ट झाले असते तर अधिक बरे झाले असते.
धनंजय काळे, देवगिरी कनिष्ठ महाविद्यालय