असं असताना ‘विक्रम वेधा’ आणि ‘भेडिया’ चित्रपटासाठीची प्रेक्षकांची प्रतीक्षा आता लांबत चालली आहे. दोन्ही चित्रपटांची OTT प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण तो ओटीटीवर प्रदर्शित करण्यास इतका विलंब का हा प्रश्न प्रेक्षकांना सतावत आहे. करोना महामारीनंतर प्रेक्षकांचा कल ओटीटीकडे वाढला आहे, त्यामुळे कोणतेही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर ओटीटी प्रदर्शित करणे चित्रपट निर्मात्यांसाठीही फायदेशीर ठरले आहे.
अलीकडेच, आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे सर्वात उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळाले. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये अगदी तोंडावर पडला होता, पण ओटीटीवरील प्रदर्शनामुळे, चित्रपटाला झालेला तोटा सावरण्याची संधी मिळाली. ‘विक्रम वेधा’चे बजेट १५५ कोटी रुपये आहे. चित्रपटाने थिएटरमध्ये हिंदी भाषेत ७९.५३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तर १२४ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘भेडिया’ चित्रपटाने केवळ ६०.३६ कोटी रुपयांचे कलेक्शन केले.
जिओच्या नवीन अॅपवर ‘विक्रम वेधा’ आणि ‘भेडिया’ होणार प्रदर्शित
तोट्यातून सावरण्यासाठी चित्रपट निर्माते ओटीटीवर मोठी डील मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘बॉलिवूड हंगामा’ मधील एका अहवालानुसार, या दोन्ही चित्रपटांच्या ओटीटी प्रदर्शनाला विलंब होत आहे कारण ते दोन्ही चित्रपट नवीन येणाऱ्या जिओ अॅपवर स्ट्रीम केले जाणार असल्याचे बोलले जाते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या नवीन OTT अॅपची तयारी सुरू आहे. ‘विक्रम वेधा’ आणि ‘भेडिया’ सारखे मोठे चित्रपट अॅपवर लाँच झाल्यावर प्रेक्षकांना उपलब्ध करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. या अॅपवर अजून काही चित्रपट प्रदर्शित करण्याचीही तयारी सुरू आहे, जे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार नाहीत आणि अॅपवर मूळ चित्रपट म्हणून प्रदर्शित केले जातील.