राज्यातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना परदेशी विद्यार्थ्यांना सुविधा निर्माण व्हावी; तसेच विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून https://fn.mahacet.org/ हे नवे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता ‘सीईटी सेल’कडून सीईटी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केंद्रीय प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. राज्यातील सरकारी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयात परेदशातील विद्यार्थ्यांची पसंती असते. मात्र, त्यांना याबाबत योग्य माहिती मिळत नाही. त्याचप्रमाणे अभ्यासक्रम, सीईटी परीक्षा आणि प्रवेशप्रक्रिया समजून घेण्यात अडचणी येत असल्याचे सातत्याने पुढे आले आहे.
या पार्श्वभूमीवर परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सुलभता निर्माण व्हावी, यासाठी नव्या वेबपोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. ‘हे वेबपोर्टल प्रामुख्याने एनआरआय, एफएनएस, ओसीआय/पीआयओ व सीआयडब्ल्यूजीसी या प्रवर्गातील उमेदवारांसाठी तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर विविध विद्यापीठांच्या संबंधित अभ्यासक्रमांची माहिती व आंतरराष्ट्रीय अभ्यासकेंद्राच्या लिंक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या वेबपोर्टलचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन, डॉ. विनोद मोहितकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
प्रवेशप्रक्रियेच्या माहितीसाठी करा नोंदणी
पोर्टलवर राज्यातील इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, एमसीए, फार्मसी, फाइन आर्टस्, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अँड केंटरिंग टेक्नॉलॉजी या शाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली आहे. त्य़ाचप्रमाणे प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी ‘वर्क फ्लो मॉड्युल’ प्रसिद्ध करण्यात आले आहे. पोर्टलवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेद्वारे लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळेल. त्याद्वारे लॉगइन करता येईल. विद्यार्थ्यांना काही अचडणी असल्यास, ते सोडविण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक आणि ई-मेल आयडीही देण्यात आला आहे.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा