एकादशी तिथी आणि मुहूर्त
विजया एकादशी व्रत काही भागात १६ फेब्रुवारीला तर काही भागात १७ फेब्रुवारीला आचरले जाईल. पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानन्याची परंपरा असल्यामुळे आपल्याकडे १६ फेब्रुवारी रोजी एकादशी व्रत केले जाईल.
विजया एकादशी व्रत १६ फेब्रुवारी वार गुरुवार
एकादशी तिथी प्रारंभ – १६ फेब्रुवारी, सकाळी ५ वाजून ३३ मिनिटे ते
एकादशी तिथी समाप्ती – १७ फेब्रुवारी सकाळी २ वाजून ५० मिनिटापर्यंत
एकादशी व्रत पारणाची वेळ – १७ फेब्रुवारी सकाळी ७ वाजून ५ मिनिटे ते १२ वाजेपर्यंत.
विजया एकादशीचे महत्व
नावाप्रमाणेच, विजया एकादशीचे उपवास केल्याने प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होतो. युधिष्ठिराला या व्रताचे महत्त्व सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, हे व्रत विजय मिळविण्यासाठी केले जाते. लंका जिंकण्यासाठी भगवान रामाने विजया एकादशीचे व्रत केले आणि त्यामुळेच रावणाशी युद्धात रामाचा विजय झाला. या एकादशी व्रताला भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची उपासना केल्याने सुख-समृद्धी मिळते आणि सर्व संकटे दूर होतात. या व्रतामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि जीवनात सकारात्मकता येते. या व्रताबद्दल शास्त्र आणि पुराणात लिहिले आहे की, विजया एकादशीचे व्रत केल्याने अन्नदान, गाय दान, सुवर्णदान, भूमी दान यांसारखे पुण्य प्राप्त होते आणि मनुष्य जन्माच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करतो.
एकादशी पूजा विधी
विजया एकादशीच्या आदल्या दिवशी वेदी बनवून त्यावर सात धान्य ठेवावे. मग त्यावर कलश ठेवा. एकादशी तिथीला ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून ध्यान करावे, त्यानंतर हातात फुले व अक्षदा घेऊन व्रत करावे. यानंतर पाच पान कलशात ठेवून चतुर्भुज स्वरूपात भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा आणि अक्षदा, शेंदूर, धूप, दीप, फळे, फुले, तुळस अर्पण करा. यानंतर मिठाई आणि तुपाचा दिवा लावावा. तुपाचा दिवा लावल्यानंतर एकादशी व्रताची कथा ऐकावी व विष्णुसहस्त्रनामाचा पाठ करावा. यानंतर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः’ मंत्राचा १०८ वेळा तुळशीमाळाने जप करावा. नंतर आरती करून दान करावे. एकादशीचे व्रत केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास सोडू शकता.
विजया एकादशी कथा
पौराणिक कथेनुसार, रामाच्या वनवासात रावणाने सीतेचे अपहरण केले. तेव्हा भगवान राम आणि भाऊ लक्ष्मण खूप चिंतीत पडले. माता सीतेचा शोध घेत असताना भगवान राम हनुमानाच्या मदतीने वानरराजा सुग्रीवाला भेटले. वानरसेनेच्या सहाय्याने भगवान राम लंकेवर चढाई करण्यासाठी विशाल समुद्रकिनाऱ्यावर आले. अथांग समुद्र असल्यामुळे लंकेवर चढाई कशी करायची? यावर काही उपाय मिळत नसतांना शेवटी भगवान रामाने समुद्रदेवाला मार्गे मागितला, पण मार्ग मिळाला नाही. तेव्हा भगवान रामाने ऋषी-मुनींना त्याचे निराकरण काय ते विचारले. तेव्हा ऋषींनी विजया एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. यासोबतच कोणतेही शुभ कार्य सिद्धीसाठी व्रत करण्याची परंपरा असल्याचेही सांगितले.