पुणे महानगरपालिका हद्दीत काही चौकांमध्ये आसाराम बापूंचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. या विरोधात शुक्रवारी (ता. १०) छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले. १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून नाही तर, ‘मातृ-पितृ दिवस’ म्हणून साजरा करावा. या आशयाचे त्यावर मायने आहे, ‘मातृ पितृ दिन’ साजरा करावा किंवा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु, हा उपदेश बलात्कारी पुरुष असलेल्या ढोंगी आसारामचे नाव घेऊन देण्यात आला आहे. यावर आम्हाला आक्षेप आहे, असे छात्रभारतीचे कार्याध्यक्ष प्रफुल कांबळे व सौरव शिंपी म्हणाले.
तर, “गुजरात येथील गांधीनगर कोर्टाने बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याबद्दल दोषी सिध्द करून भोंदू आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अशा नराधामांमुळे आपल्या समाजात मुली असुरक्षित होतात, भीतीदायक वातावरणात जगतात. अशा गुन्हेगाराच्या नावाने शहरात फ्लेक्स लावणे, ही निराशादायक बाब आहे,” असे राजवीर थोरात म्हणाले.
“होर्डिंगद्वारे आसाराम मातृ पितृ दिन साजरा करायचा संदेश देत आहेत. पण, त्याच्याच आश्रमातल्या किती माता सुरक्षित होत्या ? हे होर्डिंग अप्रत्यक्षपणे बलात्कारी पुरुषाचे गुणगान गात आहे. याने समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे,” असे वैष्णवी कोळी म्हणाली. महापालिकेने हे सर्व होर्डिंग त्वरित काढण्याचे आदेश द्यावे, असे निवेदन यावेळी देण्यात आले. या प्रसंगी उपाध्यक्ष अक्षय राउत, अनिकेत कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा
आसाराम बापूला अलीकडेच गुजरातमधील सत्र न्यायलयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अनुयायी तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात आसाराम दोषी ठरला होता. त्यानंतर न्यायालयाने आसाराम बापूला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. तर आसारामच्या पत्नीसह सहा जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.