परभणी जिल्ह्यातील दिनकरराव देशपांडे महाराज यांच्या मार्गदर्शनात ३ फेब्रुवारी रोजी सुमारे ६५ भाविकांची पदयात्रा चारठाना ते श्रीक्षेत्र माहूर करीता निघाली. या पदयात्रा दिंडीत फुलाबाई मोरे, त्यांची मुलगी नर्मदा पजई आणि तिची ३ वर्षांची मुलगी यांचाही सहभाग होता.
ही पदयात्रा ९ फेब्रुवारी रोजी माहूरला पोहोचली. दिवसभर सर्वांनी देव देवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर रात्रीला शहारातील श्री रेणुकाभक्त निवास धर्मशाळा व विष्णूकवी मठात त्यांनी मुक्काम केला. १० फेब्रुवारी रोजी पदयात्रा परत निघाण्याच्या तयारीत असताना नर्मदाची तीन वर्षीय मुलगी एकटीच दिसत होती, मात्र तिची आई व आजी कुठेच दिसत नसल्याने सगळे जण गोंधळात पडले.
दोघी मायलेकींचा सर्वत्र शोध घेण्यात आला. परंतु कुठेही त्या दिसून आल्या नाहीत. शेवटी पोलिसांना कळवण्यात आले. शोधाशोध चालू असताना लांजी येथील शेतकरी अंबादास कमठेवाड यांनी तलावात एक प्रेत तरंगत असल्याची पोलिसांना माहिती दिली.
पोलीसांनी पदयात्रे सोबत असलेल्या बाळासाहेब किसनराव झाडे यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मृतदेह फुलाबाई यांचा असल्याची ओळख पटली. तलावात नर्मदाचा शोध घेण्यात आला. तेव्हा तिचा मृतदेहही तलावात पाण्याखाली आढळला. पंचनामा करून दोन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले.
या घटनेनंतर माहूर पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय. पोलीस निरीक्षक नामदेव रिठ्ठे यांच्या मार्गदर्शनात जमादार आनंद राठोड व पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशील राठोड हे पुढील तपास करीत आहेत.
शहरानजीक मातृतीर्थ तलाव, भोजन्ती तलाव व अनेक कुंड असतांना त्या दोघी मायलेकी त्या तलावाकडे का गेल्या आणि कुणासोबत गेल्या ह्या बाबत नागरीकांत तर्क वितर्क सुरु आहे. त्यामुळे मायलेकीचा बुडून मृत्यू झाला, की घातपात असा संशय निर्माण झाला आहे.
जो पर्यंत महापालिका निवडणुका होत नाहीत तोपर्यंत पंतप्रधानाचे दौरे मुंबईत सुरु राहतील | संजय राऊत