मुंबईकरांची ४५ मिनिटे वाचणार, बीकेसीतील कोंडी फुटणार; या दोन उड्डाणपुलांमुळं मिळणार मोठा दिलासा

म. टा. खास प्रतिनिधी मुंबईः सांताक्रूझ-चेंबूर लिंक रस्त्याशी संबंधित दोन उड्डाणपूल शुक्रवारी सुरू झाले. या दोन उड्डाणपुलांमुळे ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. याद्वारे पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गाला संलग्नता मिळाली आहे.

पूर्व व पश्चिम उपनगरांना मध्य मुंबईतून जोडणारा सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड हा मार्ग आहे. मात्र वाहतुकीच्या भारामुळे या मार्गावर कायम कोंडी असते. हा मार्ग व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरातून जातो. त्यामुळे तेथे वाहतुकीची कोंडी अधिकच असते. यावर मात करण्यासाठी सांताक्रुझ-चेंबूर लिंक रस्त्यावर विविध प्रकारच्या उड्डाणपुलांची उभारणी होत आहे. त्यापैकी दोन उड्डाणपुलांचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर या भागातील वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका झाली आहे.

मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या दोन उड्डाणपुलांची उभारणी केली आहे. यापैकी पहिला उड्डाणपूल वाकोल्याच्या ग्रँड हयात हॉटेलजवळून सुरू होऊन पूर्णपणे सध्याच्या सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडच्या डोक्यावरून थेट कुर्ल्यापर्यंत येतो. या उड्डाणपुलाची लांबी १.८ किमी व रुंदी ८.५० मीटर आहे. हा उड्डाणपूल काही ठिकाणी डबल डेकर आहे.

दुसरा उड्डाणपूल बीकेसीतील एमटीएनएल एक्स्चेंज जंक्शनजवळ सुरू होऊन पुढे या उड्डाणपुलाजवळून कुर्ला परिसरातील एलबीएस मार्गापर्यंत आहे. या उड्डाणपुलाची लांबी १.२ किलोमीटर व रुंदी ८.५० मीटर आहे. या दोन्ही उड्डाणपुलांसाठी एकूण ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र यामुळे पूर्व द्रुतगती मार्ग व पश्चिम द्रुतगती मार्ग या दरम्यानच्या प्रवासात ४५ मिनिटांच्या वेळेची बचत झाली आहे.

कुरारवासीयांची सोय

कुरार गावातील रहिवाशांना पश्चिम द्रुतगती मार्ग ओलांडून मालाड स्थानकाकडे जाता यावे, यासाठी विशेष भुयारी मार्गही ‘एमएमआरडीए’ने बांधला आहे. तोदेखील शुक्रवारपासून सुरू झाला. हा भुयारी मार्ग पादचारी व वाहन या दोघांसाठीही आहे. ४० मीटर लांब व ३० मीटर लांबीच्या या मार्गामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडीतून सुटका झाली आहे.

Source link

Chembur Link RoadSantacruz – Chembur Link RoadSantacruz – Chembur Link Road projectSantacruz-Chembur Link Road (SCLR)सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड
Comments (0)
Add Comment