गेवराई शिवारात वंदना दामोधर गिऱ्हे यांची शेती आहे. त्यांनी हरभऱ्याची सोंगणी करून ठेवली होती. काल शुक्रवारी हरभऱ्याची मळणी करायची होती म्हणून वंदना गिऱ्हे या कुटुंबासह शेतात गेल्या होत्या. हरभऱ्याची मळणी करण्यासाठी मळणी यंत्र चालू केले आणि वाळलेला हरभरा मळणी यंत्रात टाकण्यासाठी वंदना या वाकून मळणी यंत्रात पाहू लागल्या आणि इथेच घात झाला.
मळणी यंत्रात वाकून पाहात असताना त्यांची वेणी मळणी यंत्राच्या बेल्टमध्ये गुंडाळली गेल्याने काही समजायच्या आत वंदना ह्या मळणी यंत्रात ओढल्या गेल्या. त्यात त्यांना जबर मार लागला. नातेवाईकांनी त्यांना तातडीने मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ.अमर मोरे यांनी तपासून मृत घोषित केले.
मळणी यंत्राच्या बाजूला काम करत असलेले या अचानक झालेल्या घटनेने अक्षरशः हादरून गेले. त्यांनी मळणी यंत्र बंद करून वंदना यांना ओढून बाहेर काढले परंतु तो पर्यंत सगळे काही संपलेले होते. जागेवर रक्ताचा सडा पडला होता आणि खाली जमा झालेला हरभरा रक्ताने माखला होता. या घटनेची माहिती ताबडतोब पोलिसांना देण्यात आली. ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली आणि क्षणात गावात शोकाकुल वातावरण झाले होते. वंदना यांच्या मृत्यूच्या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.