HSC Exam: बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा लांबणीवर

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि कॉलेजांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना बसला आहे. कर्मचाऱ्यांनी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार घातल्याने या परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ अनेक कॉलेजांवर आली आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २ फेब्रुवारीपासून सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. या संपाला कनिष्ठ कॉलेजांतील कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे. बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रयोगांची तयारी शिक्षकेतर कर्मचारी करतात. ते संपावर असल्याने शिक्षकांना वर्ग सांभाळून या परीक्षांची तयारी करणे अशक्य झाले आहे.

पूर्व उपनगरातील एका कॉलेजने ६ फेब्रुवारीला प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन केले होते. मात्र शिक्षकेतर कर्मचारी संपावर असल्याने त्या पुढे ढकलाव्या लागल्या. सध्या कॉलेजात केवळ तोंडी परीक्षा घेतल्या जात असून, पुढील आठवड्यात प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

‘शिक्षकेतर कर्मचारीच रसायनशास्त्रातील प्रयोगांसाठी विविध रसायने तयार करतात. त्यांच्याविना रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेणे शक्य नाही. परिणामी १ फेब्रुवारीपासून नियोजित असलेल्या या तीन विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा अद्याप सुरू होऊ शकलेल्या नाहीत. या परीक्षा कशाप्रकारे घेता येतील, याबाबत सरकारकडे विचारणा करण्यात आली आहे. मात्र त्यावर पुढे काही झाले नाही. आम्हाला १७ फेब्रुवारीपर्यंत या परीक्षा पूर्ण करायच्या आहेत. सोमवारी यावर तोडगा निघाला नाही, तर गोंधळ उडेल’, अशी प्रतिक्रिया घाटकोपर येथील एका कॉलेजच्या उपप्राचार्यांनी दिली. तर, अन्य एका कॉलेजने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण केल्याचे सांगितले.

…तर बोर्डाच्या परीक्षांनाही फटका

मागण्या मान्य न झाल्यास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच सर्व कामकाज थांबवण्याचे जाहीर केले आहे. त्यातच २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्यातून २० फेब्रुवारीपासून कर्मचारी संपावर गेल्यास बारावी बोर्डाच्या परीक्षाही बाधित होणार आहेत.

Source link

10th standard exam timetable12th Examhigher secondary school certificateHSC Examhsc exam date 2023HSC Exam Postponedhsc exam timetable 2023HSC SSC Exam Timetable 2023Maharashtra TimesPractical Examsecondary school certificate examssc exam date 2023ssc exam timetable 2023एसएससी दहावी परीक्षा वेळापत्रक २०२३बारावी एचएससी परीक्षा वेळापत्रक २०२३बारावी परीक्षाबारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा
Comments (0)
Add Comment