मुंबई महापालिका आठ विविध भाषांमध्ये शिक्षण देत असून, लवकरच बंगाली आणि तमिळ भाषेत शिक्षण देण्यास सुरुवात होणार आहे. पालिकेच्या ९२ माध्यमिक शाळांना राज्य सरकारने परवानगी दिली आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई महापालिकेला ही भेट दिली आहे. ‘राज्यात शिंदे व भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही करून दाखवले, बोलून दाखवत नाही,’ अशी टीका शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेता केली.
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, उपायुक्त केशव उबाळे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी, राणीबागचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी व शिक्षण विभागाच्या अधिकारी आशा मोरे उपस्थित होते. शिंदे व फडणवीस सरकार राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत असून सेलिब्रेशन मोठे नेते करतात, असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला.
शिक्षकांची समाजात महत्त्वाची भूमिका असून, भावी पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. राज्यातील अनुदानित शिक्षकांचा पगाराचा प्रश्न मार्गी लावला. तसेच राज्यातील विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवत दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी रात्र शाळांसाठी धोरण निश्चित करण्यात येत आहे. डॉक्टरांच्या गाडीवर डॉक्टर लिहिलेले असते त्याप्रमाणे शिक्षकांच्या गाडीवर टीआर लिहिण्यास लवकरच मान्यता देण्यात येईल, असेही केसरकर म्हणाले.
कोणत्या शाळेतील शिक्षकांना पुरस्कार
– मराठी १०
– हिंदी ६
– उर्दु ६
– इंग्रजी ५
– तमिळ, तेलुगू व कन्नड १
– गुजराती १
– पालिका विशेष मुलांची शाळा १
– पालिका माध्यमिक ४
– मान्यताप्राप्त खासगी अनुदानित व विनाअनुदानित १०
– पीटी शिक्षक, चित्रकला व हस्त कार्यालय ६
अशी होते निवड
– १० वर्षे निष्कलंक सेवा
– पट नोंदणी व विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी केलेले प्रयत्न
– शिक्षकाने शैक्षणिक कार्यात केलेले उल्लेखनीय कार्य
– विद्यार्थ्यांसाठी केलेले लेखन कार्य
– शैक्षणिक प्रकल्पात मिळवलेले पुरस्कार