हायलाइट्स:
- निर्बंधांविरुद्ध पुण्यातील दुकानदार आक्रमक.
- शहराच्या विविध भागांत घंटानाद आंदोलन.
- आजपासून दुकाने सात वाजेपर्यंत खुली ठेवणार.
पुणे: शहरातील करोनाचा संसर्ग कमी होत असूनही पुण्यातील निर्बंध शिथील केले जात नसल्याने व्यापाऱ्यांनी आजपासून सायंकाळी सातपर्यंत दुकाने खुली ठेवण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. गुन्हे दाखल झाले तरी दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय मागे घेतला जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यापारी आणि हॉटेलचालकांनी केला आहे. सरकारला जागे करण्यासाठी शहराच्या विविध भागांत मंगळवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. ( Pune Covid Restrictions Latest Updates )
वाचा: राज्यात करोनाचा धोका अजून टळलेला नाही; ‘ही’ आहे आजची आकडेवारी
पुणे वगळता राज्याच्या अनेक भागांतील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. पुण्यात करोना संसर्गाचा दर तीन टक्क्यांच्या जवळपास असूनही निर्बंध कायम ठेवण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. पुणे व्यापारी महासंघाने सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी मंगळवारी ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन घेतले. या आंदोलनाला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सरकारच्या भूमिकेविरोधात या आंदोलनात हॉटेल असोसिएशनचे सदस्य सहभागी झाले होते.
वाचा:महाराष्ट्राला ‘झिका’चा किती धोका?; केंद्राचे पथक तातडीने पुण्यात दाखल
लक्ष्मी रस्ता, गोपाळकृष्ण गोखले रस्ता (एफ. सी. रोड), कुमठेकर रोड, रविवार पेठ, गुरुवार पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, नाना पेठ, टिंबर पेठ, गणेश पेठ, कॅम्प, धनकवडी, बिबवेवाडी, डेक्कन, कर्वेनगर, वारजे माळवाडी, सिंहगड रोड, कोथरूड, येरवडा, पर्वती अशा सर्वच भागांमध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळिया, मनोज सारडा, अभय व्होरा, नितीन काकडे, मिलिंद शालगर, यशस्वी पटेल, राहुल हजारे, मनोज शहा आदी उपस्थित होते. युनायटेड हॉस्पिटलॅटी असोसिएशनचे संदीप नारंग, समीर शेट्टी, राहुल रामनाथ, यशराज शेट्टी आदींनी आंदोलनात भाग घेतला होता.
वाचा: मंत्रिमंडळ बैठक: ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ चार महत्त्वाचे निर्णय
शहराच्या विविध भागात व्यापाऱ्यांनी मंगळवारी शांततेत घंटानाद आंदोलने केली. बुधवारपासून चारनंतर दुकाने सुरू ठेवणार आहेत. दुकाने सुरू ठेवण्याबाबत गुन्हे दाखल झाले तरी आता माघार घेणार नाही- फत्तेचंद रांका, अध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ
युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशन पुणे व्यापारी महासंघाशी संलग्न आहे. त्यामुळे महासंघाने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो. शहरातील रेस्टॉरंट सायंकाळी सातपर्यंत सुरू ठेवण्याबाबत असोसिएशनतर्फे राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर रेस्टॉरंट खुले करण्याबाबत निर्णय घेतला जाईल – अॅड. अजिंक्य शिंदे, उपाध्यक्ष, युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशन
वाचा:पुणेकरांसाठी गणेशोत्सवाची नियमावली जाहीर; पाहा, काय आहेत नवीन नियम?