गावदेवी मंदिरात चोरी
ठाकुर्लीमधील कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रोडलगतच कचोरे गावचे गावदेवी मंदिर आहे. बुधवारी दुपारी २ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास चोरट्याने मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने देवीला नमस्कार केला. यावेळी त्याच्या हातात एक पिशवी होती. त्यानंतर त्याने तेथील मोठी समई चोरण्याचा प्रयत्न केला. पण, ती त्याला चोरता आली नाही. मग त्याने देवीच्या समोरील छोटे दिवे आणि त्रिशुल चोरून तेथून पोबारा केला.
चोरी करण्यापूर्वी देवीच्या पाया पडल्या अन् मग
विशेष म्हणजे हा चोर चोरी करण्यापूर्वी देवीच्या पाया पडताना दिसत आहे. हा सर्व प्रकार मंदिरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या चोरीप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संबंधित भूरट्या चोराला पकडण्यात आले. असून त्याच्याकडून चोरीचा माल देखील हस्तगत करण्यात आल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरिक्षक अजय आफळे यांनी दिली.
देवीसमोरील त्रिशुळ चोरला
तो चोर मंदिरात आला, त्याने प्रथम दोन्ही हातांनी देवीला नमस्कार केला. त्यानंतर त्याने देवीच्या डाव्या बाजुकडील एका कोपऱ्यात असलेल्या मोठ्या समईकडे मोर्चा वळविला. पण, ती त्याला चोरता आली नाही. तो पुन्हा देवीच्या समोर आला आणि हात जोडले. काही मिनिटांतच तिथला त्रिशुळ आणि अन्य वस्तू चोरून त्याने पिशवीत घातल्या आणि तेथून पोबारा केला.
चोरट्यांची वक्रदृष्टी पाहता मंदिरे सुरक्षित नाहीत
ठाकुर्ली कचोरेतील गावदेवी मंदिरात दिवसाढवळ्या ही चोरी झाली. विशेष बाब म्हणजे या मंदिरात गेल्या काही वर्षातील चोरीची ही तिसरी घटना आहे. एकीकडे बंद घरं सुरक्षित राहिली नसतानाच चोरट्यांची वक्रदृष्टी पाहता मंदिरंही आता सुरक्षित नाहीत असं दिसून येत आहे.