नऱ्हे येथील भूमकर पुल चौकात दररोज सकाळी व सायंकाळी वाहनांची मोठी गर्दी असते. ऐन गर्दीच्या वेळी कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने एकच हाहाःकार उडाला. या अपघातातील एका क्रेटा वाहनाला कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे क्रेटा हवेत चेंडूसारखी उडाली. काही क्षणाकरिता तिथे असलेल्या नागरिकांना काय झाले हेच समजेना. तिथे असलेले वाहतूक कर्मचारी माधव गोपनर यांच्या जवळून कंटेनर गेला. ते थोडे जरी मागे – पुढे थांबले असते तर मोठा अनर्थ टळला.
कंटेनर चालक पंकज महापात्रे (वय ५७ वर्ष, रा. उमरगा, जिल्हा उस्मानाबाद) याला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेली माहिती अशी की, शिरवळवरून फ्रिज व इतर साहित्य घेऊन निघालेला कंटेनर नऱ्हे येथील भूमकर पुलाजवळ सेवा रस्त्यावर आला असता कंटेनरचे ब्रेक झाले. दरम्यान चौकात असणारे वाहतूक कर्मचारी माधव गोपनर, महेंद्र राऊत, सुशांत यादव या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी त्वरित इतर रस्त्याने येणारी वाहतूक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र कंटेनर समोर असणाऱ्या दोन चारचाकी, एक तीनचाकी रिक्षा व एका दुचाकीला कंटेनरची धडक बसली.
यामध्ये दोन जण जखमी झाले. घटनेनंतर नागरिकांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून इतर वाहनामधील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
आरोपीला फाशी होणारच, खासदार विनायक राऊतांचा शशिकांत वारिशेंच्या आईला शब्द