नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील जुगणीच्या हिरीचापाडा येथे अलका अमिताभ वळवी (वय ३३) या आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होत्या. त्या तेथीलच अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. एकात्मिक बालविकास प्रकल्प तोरणमाळ या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रांसाठी तोरणमाळ येथे मिटींग घेण्यात आली. ही मिटींग करून गावाकडे परत येत असताना अलका वळवी यांनी घाटात उडी घेत आत्महत्या केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तीन वर्षांपासून पगार नाही, अधिकाऱ्यांकडून मानसिक छळचा आरोप
अंगणवाडी सेविका अलका अमिताभ वळवी (वय ३३) यांना तीन वर्षांपासून कामाचा कुठलाही मोबदला मिळत नव्हता. पगाराविना राबविणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी तिला मानसिक त्रास दिला. या त्रासाला आणि गरीबिला कंटाळून अंगणवाडी सेविका अलका वळवी यांनी घाटात उडी घेत आत्महत्या केल्याचा आरोप पती अमिताभ जोमा वळवी यांनी केला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृत महिलेचे पती अमिताभ वळवी यांनी म्हसावद पोलिसांत केली आहे.
पतीनेच घेतली पोलिसात धाव, न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह मिठात ठेवणार
पत्नी अलका अमिताभ वळवी (वय ३३ वर्षे मु.जुगणी हिरीचापडापाडा) येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होती. गेल्या ३ वर्षांपासून पत्नीला पगार मिळाला नाही. यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. माझ्या सोबत माझी पत्नी अलका अमिताभ वळवी आम्ही तोरणमाळ येथे मीटिंगला गेलो होतो. मिंटिंग संपल्यानंतर आम्ही तेथून परत येत असताना पगार न मिळाल्यामुळे पत्नी मानसिकरित्या अवस्थ होती. सरकार पगार देत नाही व वेळोवेळी मानसिक त्रास दिला जात होता. मा. बालविकास अधिकारी किशोर पगारे, विस्तार अधिकारी पंकज बोरसे यांच्याकडे वारंवार पगार देत नसल्याची तक्रार केली असता उडवा उडवीचे उत्तरे दिली. संबंधित लोकांच्या त्रासाला पत्नी कंटाळली होती. म्हणून तिने माझ्या मोटारसायकलवरून उडी घेतली. त्यांनतर तिला एका अज्ञात व्यक्तीच्या गाडीत राणीपूर येथील सरकारी रुग्णालयात घेऊन गेलो. तेथून म्हसावद येथील रुग्णालयात रुग्णवाहिकेने नेण्यात आले. तेथे पत्नी अलका मृत घोषित केले, असे मृत महिलेच्या पतीने पती अमिताभ जमा वळवी यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही.
यासंदर्भात पीडित कुटुंबाने पोलीस स्टेशन म्हसावद ता.शाहादा गाठले. संबंधित एकात्मिका महिला बालविकास प्रकल्प तोरणमाळचे प्रकल्पधिकारीसह कर्मचारीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा स्वरूपाची तक्रार दिली आहे. पीडित मृत अलका अमिताभ वळवी यांना न्याय मिळत नाही, तो पर्यंत मृतदेह मिठात ठेवणार, असे पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.