पत्रकार शशिकांत वारीशे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT नेमण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत ही SIT स्थापन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
काय म्हणाले शरद पवार?
एका आठवड्यात तिथे पाच-सात असे गुन्हे घडले, असं एका वर्तमानपत्रात वाचण्यात आलं. हे काही चांगलं लक्षण नाही. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था नेहमी चांगली असते. पण हल्ली त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ज्यांची आहे, ते कितपत लक्ष देतात यासंबंधिच्या शंका निर्माण व्हायला लागल्या आहेत. त्या संबंधिचं वृत्त छापून आलं आहे. आता पत्रकारांची सुद्धा ही अवस्था झाली, तर याचा अर्थ काय, राज्य कोणत्या दिशेने चाललंय हे आता समजून घ्यावं लागेल, असं म्हणत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. दररोज काहिना काहीतरी नवीन समोर येतंय. हल्ला आणि हत्या या प्रकारच्या बातम्या येत आहेत. किंवा रस्त्यावरचे अपघात, या दोन गोष्टी महाराष्ट्रात वाढल्या आहेत. ही चिंताजनक बाब आहे, असं शरद पवार म्हणाले.
काय म्हणाले विनायक राऊत?
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी वारीशे कुटुंबीयांची भेट घेतली. आणि त्यांनी कुटुंबीयांचं सांत्वन केलं. न्यायासाठी झगडणारा आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या पत्रकार वारीशे यांची हत्या करण्यात आली आहे. भूमाफियांनी त्यांची हत्या केली आहे. याचा आम्ही धिक्कार आणि निषेध करतो.
वारीशे प्रकरणावरून मंत्री गिरीश महाजन यांचं राऊतांना प्रत्युत्तर
संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. वारीशे प्रकरणात आरोपीला राजाश्रय दिला जातोय, असे ते म्हणतात. पण कालच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फास्ट ट्रकवर प्रकरण हाताळणार असल्याचे म्हटले आहे. राऊत हे प्रसिद्धीसाठी बोलत आहेत. त्यांच्या सरकारच्या काळात पत्रकारांचे हाल झालेत. राजाश्रय दिला असता तर आरोपीला पकडले नसते. राऊत रोज भोंगा वाजवत आहेत. दिवसाढवळ्या कोणी कायदा सुव्यवस्था मोडत असेल तर त्याला शिक्षा होणारच.
देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पबाबत बोलावे आणि हत्या व्हावी याचा काहीही सबंध नाही. राऊत यांनी त्यांच्या काळात काय झाले ते आठवावं, असं प्रत्युत्तर मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये दिलं.