शंकर नारायण काटे ( वय ६१) आणि संगीता शंकर काटे ( वय ५५) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. खून केल्याचे कारण अद्याप समजले नसून पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणी आरोपी प्रमोद मगरुडकर याला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दापोडी परिसरात काटे दाम्पत्य गेल्या काही दिवसांपासून रहात होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास एका व्यक्तीने काटे पती-पत्नीचा डोक्यात फावडे घालून खून केला. त्यानंतर आरोपी रक्ताने माखलेल्या कपड्यात रस्त्यावरून फिरत होता. तोंडाने काही तरी बडबड करत ‘जगदंबा जगदंबा’, असे म्हणत होता.स्थानिक नागरिकांनी त्याला हत्यारासह पोलिसांच्या ताब्यात दिले. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी या घटनेचा पूर्वीच्या घटनेची मोठी किनार असण्याची असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकही रस्त्यावर आले होते. आरोपीला घेराव घालून त्याला जाब विचारत असताना आरोपी काही तरी ‘जगदंब जगदंब’, असे शब्द पुटपटत होता. त्यानंतर नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. या तपासातून पुढे काय निष्पन्न होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीत लक्षणीय वाढ
गेल्या काही दिवसांमध्ये खून, जीवघेणे हल्ले, कोयता गँगची दहशत अशा एक ना अनेक कारणांमुळे गुन्हेगारीच्या क्षेत्रात पुणे जिल्ह्याचे नाव सातत्याने चर्चेत आहे. गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण हे जिल्ह्याच्यादृष्टीने चिंतेची बाब मानली जात आहे. मध्यंतरी कोयता गँगची दहशत शिगेला पोहोचली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत कोयता गँगच्या मुसक्या आवळल्या होत्या. एवढेच काय पुण्यात कोयत्यांची विक्री करतानाही काही निर्बंध लादण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्यही करण्यात आले होते. मात्र, यानंतरही पुणे जिल्ह्यातील हिंसाचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत.