लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असणाऱ्या अलमला येथे सूरजचा जन्म झाला. लहानपणापासून सूरजला पोलीस दिसले की मोठे कौतुक वाटायचे. आपणही मोठं झाल्यावर पोलिसच होणार असल्याचं तो आई वडिलांनाच नव्हे तर प्रत्येकाला सांगायचा. लहानपणी पोलिसांचा पोषाखही तो हट्टाने घालायचा. त्याच्या या कृतीचं अन् निर्णयाचं सर्वांनाच मोठं अप्रूप वाटायचं. पोलीस व्हायचं स्वप्न उराशी बाळगूनच सूरज मोठा झाला. त्याने शिक्षण पूर्ण केलं.
त्यानंतर पोलीस भारतीसाठी तो अहोरात्र प्रयत्न करू लागला. नियमित अभ्यास अन् मैदानी कसरती सूरज न चुकता करायचा. आजही तो भल्या पहाटे व्यायामासाठी घराच्या बाहेर पडला पण तो कायमचाच. पहाटे ५ वाजता लातूर – औसा राष्ट्रीय महामार्गावर बुधोडा गावाजवळील अलमला मोड येथे सूरज शारीरिक कसरती करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने सूरजला चिरडलं आणि सूरजचं पोलीस व्हायचं स्वप्न क्षणात भंगले. सूरजचा जागीच मृत्यू झाला.
सूरजसोबत शारीरिक कसरती करणारा त्याचा मित्र देखील या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. औसा पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, सूरजच्या अपघाती निधनाने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अलमला गावावर शोककळा पसरली आहे.