राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारवाईनंतर प्रशांत बाबर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे समर्थन करणे चुकीचे आहे का? माझ्यावर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी कारवाई केली, ती अयोग्य आहे. त्यांना अधिकारच नाही. उलट वरिष्ठांची मर्जी ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षकांचा मनमानी कारभार सोलापुरात सुरू आहे, असा आरोप प्रशांत बाबर यांनी केला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीत झालेल्या वादात प्रशांत बाबर यांचा बळी
आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघाची निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली. यामुळे सोलापुरातील राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार असेल, अशी मागणी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी केली. काँग्रेसमधील नेत्यांनी याचा विरोध केला. यावरून सोलापूर शहरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता.
कोण रोहित पवार?, अजून ते मॅच्युअर नाहीत; सोलापूर लोकसभा राष्ट्रवादीसाठी मागितल्याने प्रणिती शिंदेंची आगपाखड
आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. ‘कोण रोहित पवार, ते अजून मॅच्युअर नाहीत’, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी रोहित पवारांवर केली. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांत संतापाची लाट पसरली होती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह काँग्रेस भवन येथे जाऊन आमदार रोहित पवार व आमदार प्रणिती शिंदे यांचा एकत्रित असलेला फोटो लावत आमदार प्रणिती शिंदे यांना रोहित पवार कोण आहेत याची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला.
जयंत पाटील यांच्या दौऱ्यात प्रशांत बाबर यांची माध्यमांसोबत चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारी रात्री सोलापूर दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या घरी जाणार होते. यावेळी प्रशांत बाबर यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांबाबत माध्यमांना चुकीची माहिती दिली, असे भारत जाधव (शहर अध्यक्ष, एनसीपी ) यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या फेसबुक पेजवर चुकीचे पोस्ट टाकून शहर निरीक्षकाबाबत संभ्रम निर्माण केला, अशी कारणे सांगत भारत जाधव यांनी अधिकृत परिपत्रक काढत प्रशांत बाबर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करत असल्याचे जाहीर केले.
मविआचे आणखी १०-१५ आमदार फुटण्याचा बच्चू कडूंचा दावा, प्रतिक्रिया विचारताच जयंत पाटलांचं मौन
हकालपट्टी करण्याचा अधिकार यांना कोणी दिला?
भारत जाधव यांना कोणताही अधिकार नाही. पवार कुटुंबावर जो कोणी बोलेल त्याला आम्ही कायम विरोध करणार. सोलापूर शहर राष्ट्रवादीतील काही मंडळी वैयक्तिक स्वार्थासाठी प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करत आहेत. माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महिबूब शेख यांना आहे. राष्ट्रवादी सोलापूर शहर अध्यक्ष भारत जाधव यांचा सोलापुरात पक्षांतर्गत मनमानी कारभार सुरू आहे. मी राष्ट्रवादीमधील वरीष्ठ नेत्यांकडे न्याय मागणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत बाबर यांनी दिली आहे.
भारत जाधव पक्षाचे शहर अध्यक्ष झाल्यापासून सोलापुरात राष्ट्रवादीची पडझडच झाली आहे. २०१७ मध्ये महानगरपालिका निवडणुका झाल्या. २०१९ मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाची अवस्था बिकटच झाली. याला भारत जाधव जबाबदार आहेत, असा आरोप प्रशांत बाबर यांनी केला आहे.