म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, लोकल प्रवासाची मुभा नसल्याने गोंधळात भर पडल्याचे चित्र मंगळवारी दिसले. मुंबईतील सर्व कार्यालये, आस्थापना खुली करण्यास अनुमती मिळाल्याने रस्त्यावरील प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आणि बेस्टच्या सेवेवर खूप ताण आला. कार्यालये, बाजारपेठांमध्ये गर्दी वाढल्याने वाहतूककोंडीत भर पडली.
आस्थापना सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर सरकारीप्रमाणेच खासगी कार्यालयांमध्ये जाण्यासाठी मंगळवारी सकाळपासून गर्दी वाढू लागली. मात्र, लोकलसेवा सर्वांसाठी खुली झाली नसल्याने घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा भार हा रस्ते वाहतुकीवरच पडला. मुंबईकरांनी खासगी वाहने, रिक्षा, टॅक्सींसह अॅपआधारित सेवांचा पर्याय स्वीकारला. तर बेस्टच्या बससेवांचाही प्रामुख्याने समावेश होता. त्यामुळे सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत बस गर्दीने भरून वाहत होत्या.
बेस्ट ताफ्यातील बसची मर्यादित संख्या आणि वाहतूककोंडीने प्रवाशांचे हाल होत आहेत. बसथांब्यावर बराच वेळ वाट बघून प्रवास सुरू होत होता. त्यात प्रवासवेळही वाढला. लांब अंतरावर राहणाऱ्या प्रवाशांसाठी हा प्रवास कंटाळवाणा, मनस्ताप देणारा ठरला. बसमध्ये मास्कचा वापर, सुरक्षित अंतर हे सारे नियम पायदळी गेले. फक्त कसाबसा श्वास घेत प्रवास करण्याची कसरत सुरू असते, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. दुकानांची वेळ रात्री १० पर्यंत केल्याने दादर, काळबादेवी, गांधी मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, वांद्रे, कुर्लासह विविध छोट्या मोठ्या बाजारपेठांमध्ये गर्दीही उसळली होती.