याबाबतची अधिक माहिती अशी की, पूजा देवेंद्र मोराणकर (वय ४४ वर्ष रा. विक्रीकर भवन, आनंद नगर पाथर्डी फाटा) असे चक्कर येऊन दुर्दैवी मृत्यू झालेल्या मातेचे नाव आहे. विक्रीकर भवन आनंद नगर, पाथर्डी फाटा येथे गजानन अर्केड या इमारतीमध्ये मोराणकर कुटुंबीय वास्तव्यास आहे. पूजा गर्भवती असल्याने त्यांची काळजी घेण्यासाठी वडील व त्यांची बहीण तिच्या सासरीच राहत होते. पूजा मोराणकर या गर्भारपणाच्या काळात घ्यायची सर्व काळजी योग्यप्रकारे घेत होत्या. त्या नियमित स्त्री रोगतज्ञांकडे तपासणीसाठी जायच्या.
त्या साडेसात महिन्यांच्या गर्भवती होत्या. पूजा मोरणकर यांना रविवारी अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे वडील आणि बहिणीने त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचे ठरवले. यासाठी दोघेजण पूजा यांना इमारतीच्या खाली घेऊन आले. रस्ता ओलांडुन डॉक्टरकडे जाण्यासाठी त्या रिक्षाची वाट बघत असताना पूजा मोराणकर यांना अचानकपणे चक्कर आली आणि त्या जमिनीवर कोसळल्या. यानंतर पूजाला त्वरीत पाथर्डी फाटा येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत झाल्याचे घोषित केले. त्याचबरोबर गर्भातील जुळ्या अर्भकांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे पाथर्डी फाटा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घरात २१ वर्षांनी हलणार होता पाळणा
पूजा मोराणकर या अनेक दिवस मूल होण्यासाठी प्रयत्न करत होत्या. त्यांच्या प्रयत्नांना यश आले होते. त्यांना जुळी अपत्य होणार होती. मोराणकर कुटुंबात तब्बल २१ वर्षांनी पाळणा हलणार होता. काही दिवसांतच मोराणकर यांची प्रसुती झाली असती. मात्र, त्यापूर्वीच पूजा मोराणकर यांचा त्यांच्या पोटातील मुलांसह दुर्दैवी अंत झाला.