पूर ओसरल्यानंतर आता वेढा आजारांचा; मात्र रुग्णालयात दाखल होण्यास नकार

म. टा. विशेष प्रतिनिधी, महाडः महाडमध्ये पूर ओसरल्यानंतर आजाराचे संकट घोंघावू लागले आहे. लेप्टोस्पायोसिस, डेंग्यू, मलेरिया यासह करोनारुग्णांची संख्याही हळूहळू वाढत आहे. पुरामुळे आलेला चिखल अद्याप पूर्णपणे काढण्यात आलेला नाही. अनेक ठिकाणी दुकानांतील आणि घरातील बाहेर फेकून दिलेला कचरा तसाच पडून आहे. वैद्यकीय तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी १९ जणांना लेप्टोस्पायरोसिसची लागण झाली आहे, तर करोनाच्या तीन रुग्णांची नोंद येथे झाली आहे.

पूर ओसरल्यानंतर महाडमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. स्वच्छता मोहीम व्यापक प्रमाणात सुरू असली तरीही अद्याप संपूर्ण शहर स्वच्छ झालेले नाही. १८ ठिकाणी घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये १२ हजार ९३१ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यात १९ जणांना लेप्टोस्पायरोसिसची लागण झाल्याचे दिसून आले. चारशे जणांची अॅण्टीजेन चाचणी करण्यात आली. वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद मिळावा यासाठी सर्वसामान्यांचे समुपदेशन करणे गरजेचे असल्याचे ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी पाटील यांनी सांगितले. दीड हजार जणांना टिटॅनसचे इंजेक्शन देण्यात आले असून डॉक्सीसायक्निच्या औषधांचे वाटपही करण्यात आले आहे.

सर्वसामान्यांनी पुढाकार घेऊन वैद्यकीय चाचण्या करून घ्याव्यात यासाठी प्रशासनाकडून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. आजार लपवल्याने बरा होणार नाही. पुराचे संकट मोठे असले तरीही आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य द्यायला हवे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

रुग्णालयात दाखल होण्यास नकार

महाडमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून मदत येत आहे. या मदतीमागील भावना चांगली असली तरीही या गर्दीमुळे संसर्ग फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. करोनासाठी आरोग्य शिबिरांमध्ये अॅण्टीजेन चाचण्या करण्याचीही अनेकांची तयारी नाही. एका १२ वर्षांच्या मुलाची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह होती, मात्र पालकांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला, असा अनुभव येथील आरोग्य शिबिरांत कार्यरत असलेल्या वरिष्ठ वैद्यकीय डॉक्टरांनी सांगितला. घरामध्ये विलगीकरण करू असा हट्ट त्यांनी धरला, तर दोन तरुण रिपोर्ट कळताच तातडीने निघून गेले. त्यांच्या मागे कसे व कुठे जाणार, असा प्रश्न डॉक्टरांनी विचारला. घरांमध्ये अस्वच्छ पाणी तसेच चिखलगाळ असताना रुग्णांचे विलगीकरण कसे व कुठे करणार, हा प्रश्न स्थानिकांपुढे असला तरीही रुग्णालयात दाखल होण्याची त्यांची तयारी नसल्याचे डॉक्टर सांगतात.

Source link

Disease outbreak flood affected villagesflood affected villagesMahad Floodmaharashtra floodमहाड पूर
Comments (0)
Add Comment