बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिकीट दरात सवलतीनंतर आता पदवी, पदविका, आयआयटी अभ्यासक्रम, पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांनाही ३० टक्के सवलतीचा निर्णय महामेट्रोने घेतला. आज, सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महामेट्रोने अचानक वाढविलेल्या तिकीटदरामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. प्रवासीसंख्येतही घट झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तिकीट दर कमी करण्यासाठी महामेट्रोला निवेदनही दिले होते. ७ फेब्रुवारीपासून शालेय तसेच इयत्ता बारावीपर्यंतच्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महामेट्रोने तिकिट दरात ३० टक्के सवलत लागू केली होती. मेट्रोतून प्रवासासाठी असलेल्या प्रत्येक किमीच्या टप्प्यासाठी ही सवलत राहील.
रोख तसेच महाकार्डचा वापर करणाऱ्यांना या सवलतीचा लाभ घेता येईल. महाकार्डची सेवा देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सॉफ्टवेअरमध्ये नव्या सवलतीनुसार सुधारणा केली असून सोमवारपासून महाकार्डधारकही सवलतीचा लाभ घेऊ शकणार आहे. शाळा, कॉलेजचे ओळखपत्र दाखवून विद्यार्थी स्टेशनवरून महाकार्ड मिळवू शकतील.
‘त्यांचे’ पैसे परत…
महाकार्डवर ७ फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रवासात जुन्याच दराने तिकीट आकारले गेले होते. याचा परतावा ओळखपत्र दाखवल्यानंतर कार्डच्या टॉप-अपमध्ये जमा होईल. कार्ड टॉप-अप करताना ही रक्कम कोणत्या तारखेपासून उपलब्ध होईल, याबाबत लवकरच खुलासा केला जाणार आहे. एसबीआयने कार्ड उपलब्ध करून दिल्यानंतर महामेट्रोद्वारे केवळ विद्यार्थ्यांसाठी वेगळे महाकार्डही तयार केले जाणार आहे. या महाकार्डमध्ये सवलतीची वैशिष्ट्ये असतील. सध्या महाकार्ड वापरणाऱ्या सर्वांनाच १० टक्के सवलत दिली जात आहे.