संजय कदम यांच्या अडचणी वाढणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कदम हे दापोली मंडणगड मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांचे प्रमुख विरोधक आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय कदम हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. संजय कदम यांना आता एसीबीची नोटीस आल्यानं रत्नागिरीमध्ये खळबळ उडाली असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटात जाण्यापूर्वीच एसीबीचं नोटीस
राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात ५ मार्चला प्रवेश करणार आहेत. यासाठी खेड येथील गोळीबाार मैदानात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे. संजय कदम यांनी सेनेत प्रवेश केल्यास योगेश कदम यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाला बळ मिळणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.
नोटीस आलीय, संजय कदम यांची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला असता त्यांनी एसीबीची नोटीस मिळाल्याचं मान्य केलं आहे. “होय आपल्याला ही नोटीस मिळाली आहे, मी आता मुंबई येथे आहे” एसीबीच्या नोटीस प्रकरणी सविस्तर भूमिका लवकरच मांडणार असल्याचं संजय कदम म्हणाले.
सेनेच्या तीन आमदारांची चौकशी यापूर्वीच सुरु
शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात असणाऱ्या तीन आमदारांच्या संपत्तीची यापूर्वीच चौकशी एसीबीकडून सुरु करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर जे आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचं चित्र आहे. आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक आणि आमदार नितीन देशमुख यांची एसीबीकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. तर, आता सेनेच्या वाटेवर असलेल्या संजय कदम यांना देखील एसीबीची नोटीस प्राप्त झालीय.