जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत सुभाष लुंड हे आपल्या पत्नी राणीबाई लुंड यांच्यासह वास्तव्याला होते. ते राहत असलेल्या सिंधी कॉलनी परिसरातच त्यांचे केकचे दुकान आहे. या दुकानाच्या माध्यमातूनच ते आपला उदरनिर्वाह भागवित होते. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कर्जबाजारीपणामुळे त्यांचे दुकान बंद होते. त्यामुळे काही दिवसांपासून ते तणावात तसेच नैराश्यात होते.
सुभाष लुंड यांनी शनिवारी रात्री पत्नीसोबत जेवन केले आणि नंतर झोपले होते. पत्नी राणीबाई ह्या सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांना पती सुभाष लुंड हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. यानंतर राणीबाई यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सातपुते यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, कर्जाबाजारी झाल्याने नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील हे करीत आहेत.