‘…त्याचा शोध घेतला तर धागेदोरे भाजपपर्यंत पोहोचतात’

हायलाइट्स:

  • पेगॅसस प्रकरणावरून संसदेचं कामकाज विस्कळीत
  • शिवसेनेचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल
  • हेरगिरी प्रकरणावर संसदेत चारेक तास चर्चा झाली तर काय बिघडणार आहे? – शिवसेना

मुंबई: ‘पेगॅसस’ पाळत प्रकरणात देशाच्या राजकीय वर्तुळात अजूनही अस्वस्थता आहे. पेगॅसस प्रकरणाच्या चौकशीची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली आहे, तर भाजपनं चर्चेला नकार देत विरोधक संसद चालू देत नाहीत असा आरोप केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांच्या या टीकेचा शिवसेनेनं समाचार घेतला आहे. (Shiv Sena Blames Modi government for Parliament Disruption)

‘संसद का चालत नाही’ अशा शीर्षकाखालील अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. ‘संसदेत काम होत नाही हा लोकशाहीचा अपमान आहे, पण या अपमानाच्या परंपरेचे जनक कोण आहेत, याचा शोध घेतला तर ते धागेदोरे भाजप किंवा एनडीएपर्यंत पोहोचतात. भ्रष्टाचार, राष्ट्रीय सुरक्षा, जनतेच्या प्रश्नांवर भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने संसदेची अनेक अधिवेशने यापूर्वी गोंधळ-गदारोळात संपवून टाकली आहेत व त्या संघर्षात शिवसेना त्यांच्या साथीला होतीच. बोफोर्सपासून टू जी प्रकरणापर्यंत त्या वेळी विरोधी पक्षात असलेल्या एनडीएने संसदेत चर्चेची आणि संयुक्त संसदीय समितीची मागणी करत घातलेला गोंधळ हे लोकशाही जिवंत व दणकट असल्याचे लक्षण होते,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा:‘बाबासाहेब पुरंदरेंनी केलेली इतिहासाची मांडणी चुकीचीच आहे, पण…’

‘अनेक विषयांवर संसदेत विरोधकांना बोलायचं आहे, पण सरकार पक्ष पेगॅससची ढाल पुढं करून या सर्व विषयांपासून पळ काढत आहे. हे चांगल्या लोकशाहीचं लक्षण अजिबात नाही. ‘पेगॅसस’ हा काय मुद्दा आहे काय? त्याचा सामान्य जनतेशी काय संबंध? असं सरकार पक्षाचं म्हणणं आहे. आता राष्ट्रीय सुरक्षा हा राष्ट्रहिताचा मुद्दा होत नसेल तर काय बोलायचं? हेरगिरी प्रकरणावर संसदेत चारेक तास चर्चा झाली व सरकारनं उत्तर दिलं तर काय बिघडणार आहे? विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेण्याची संधी सरकारला मिळेल, पण सरकार तेही करायला तयार नाही. मग लोकशाहीचे मारेकरी कोण?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

‘पंतप्रधान मोदी यांनी थोडा पुढाकार घेतला असता तर संसदेचं काम सुरळीत चाललं असतं व लोकशाहीचा अपमान टाळता आला असता. संसदेची, लोकशाहीची प्रतिष्ठा राखण्याचं कर्तव्य सत्ताधारी पक्षालाच पार पाडावं लागतं. तसं आज होताना दिसत नाही. विरोधकांना कस्पटासमान लेखण्याची नशा सत्ताधाऱ्यांना चढली आहे. त्यातून देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागेल. सरकारच्या या प्रवृत्तीविरुद्ध विरोधी पक्ष एकवटून जनता पक्षासारखा ‘खेला होबे’ प्रयोग पुन्हा होऊ शकतो,’ असा सूचक इशाराही शिवसेनेनं दिला आहे.

वाचा: राष्ट्रवादीच्या आणखी एका दिग्गज नेत्याचा मुलगा समाजकारणात

Source link

Latest Saamana Editorialpegasus controversyShiv Sena Blames Modi GovernmentShiv Sena Vs BJP Latest News Updateपेगॅसस पाळत प्रकरणशिवसेनाशिवसेना विरुद्ध भाजप
Comments (0)
Add Comment