करोनामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष सलग दोन वर्षे विस्कळित झाले. करोनाचा प्रादुर्भाव नसल्याने २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, या शैक्षणिक वर्षाला कमालीचा उशीर झाला. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश उशिरा झाल्यामुळे परीक्षांचे नियोजनही उशिरा करण्यात आले. अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी सत्र परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे.
त्यातच १६ फेब्रुवारीला लाक्षणिक संपही पुकारण्यात आला आहे. या संपाची सरकारने देखल न घेतल्यास, २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे परीक्षेचे कोणतेही कामकाज होणार नाही, असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा मार्चपर्यत सुरू राहणार असून, त्यानंतर निकाल जाहीर होणार आहे.
त्यामुळे उन्हाळी सत्राच्या परीक्षा कधी होतील, निकाल कधी जाहीर होईल आणि पुढील शैक्षणिक वर्ष कधी सुरू होईल, याचे नियोजन कोलमडले आहे. पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा साधारण मार्च-एप्रिलमध्ये सुरू होऊन, मे-जूनमध्ये निकाल जाहीर होतात. मात्र, आता हिवाळी परीक्षा सुरू आहेत. या सर्वांचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
बैठकीचे इतिवृत्त किंवा निर्णय नाहीच
विद्यापीठातील आणि महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. ‘या बैठकीत मागण्या पूर्ण करण्याबाबत सकारात्मकता व्यक्त करण्यात आली. मात्र, बैठकीचे इतिवृत्त आणि त्यानंतर निर्णय, असे काहीही प्रसिद्ध झालेले नाही. त्यामुळे नाइलाजास्तव आम्हाला संपाचा पवित्रा घ्यावा लागला आहे. सरकारने मागण्यांकडे लक्ष न दिल्यास बेमुदत संप करण्यात येईल,’ असा इशारा महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे सचिव सुनील धीवार यांनी दिला.
कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामकाजाबाबत असहकार आंदोलन पुकारल्याने, परीक्षेचे अपेक्षित कामकाज होत नाही. विद्यार्थिसंख्या अधिक असणाऱ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्ण झाल्या असल्या, तरी काही परीक्षा अजूनही बाकी आहेत. परीक्षा झाल्यानंतरही निकालाच्या प्रक्रियेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारने लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.
– अनिल लोखंडे, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ