महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) पुढील २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. मात्र, या परीक्षांची नोंदणी प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे या परीक्षांसाठी नोंदणी कधी सुरू होणार; तसेच प्रत्यक्ष परीक्षा कधी होणार, अशी विचारणा होत आहे. या परीक्षा वेळेत झाल्या नाहीत, तर शैक्षणिक वर्ष सलग तिसऱ्या वर्षी उशिराने सुरू होण्याचे चिन्ह आहे.
‘सीईटी सेल’कडून इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, बीएड अशा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येतात. विद्यार्थी आणि पालकांना परीक्षांची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध व्हावा, यासाठी या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आणि नोंदणीची प्रकिया सुरू होणे गरजेचे असते. त्यानुसार ‘सेल’ने साधारण दीड महिन्यापूर्वी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. मात्र, परीक्षांसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू झाली नाही.
करोनापूर्व कालावधीत एमबीए, एमसीए अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा मार्च महिन्यात झाल्या होत्या. त्यानुसार यंदाही संभाव्य वेळापत्रकात एमबीए सीईटी १८ आणि १९ मार्च, तर एमसीए सीईटी २५ आणि २६ मार्च अशा तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र, अजूनही अंतिम नियोजन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे या परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होऊन, प्रत्य़क्ष परीक्षा कधी होणार, याबाबत विद्यार्थी-पालकांना माहिती नाही.
‘वेळपत्रक तातडीने अंतिम करा’
‘सीईटी सेल’ने साधारण दीड महिन्यापूर्वी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले होते. त्यानंतर हे वेळापत्रक अंतिम करून, ‘सीईटी सेल’च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करणे अपेक्षित होते. मात्र, याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे परीक्षांबाबत विद्यार्थ्यांत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या तुलनेत खासगी विद्यापीठांकडून प्रवेशपक्रिया वेळेत राबविण्यात येत आहे. त्यामुळे ‘सीईटी सेल’ने परीक्षा वेळेत घेऊन, प्रवेश प्रक्रिया न राबविल्यास विद्यार्थ्यांना जादा शुल्क भरून खासगी विद्यापीठांत प्रवेश घ्यावा लागणार, असे चित्र आहे.