या स्पर्धेसाठी सोमवारी मुंबईत खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली. यात आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाने दिशाला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने दिशाला १० लाखांच्या मुळ किंमतीवर संघात स्थान दिलंय. मुळची अमरावतीची असलेली दिशा मधल्या फळीतील फलंदाज असून ऑफस्पिन गोलंदाजीही करते.
गेल्या वर्षी बीसीसीआयने आयोजित केलेल्या महिलांच्या टी-२० चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत इंडिया ए संघात तिची निवड झाली होती. विशेष म्हणजे देशांतर्गत टी२० क्रिकेट स्पर्धेत विदर्भ संघाकडून खेळताना ३०० धावा काढत दिशा सर्वाधिक रन्स काढणारी फलंदाज ठरली होती. या कामगिरीच्या जोरावर दिशाला महिलांच्या आंतर विभागीय ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत मध्य विभागाच्या संघात स्थान देण्यात आले होते.
जलदगती गोलंदाज म्हणून ज्युनियर पातळीवर कारकीर्द गाजवणारी दिशा वरिष्ठ पातळीवर येईपर्यंत फलंदाजीकडे वळली आणि सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील एक उत्तम फलंदाज म्हणून तिने नावलौकिक मिळवला आहे. दिशाचा हा प्रवास चांगलाच खडतर राहिला आहे. प्रचंड मेहनतीच्या जोरावर तिने इथपर्यंत मजल मारली आहे.
आतापर्यंत विदर्भाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोना मेश्राम हिने भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दिशाची एकूणच कामगिरी बघता आगामी काळात भारतीय संघात तिला स्थान मिळाले तर नवल वाटू नये असा विश्वास माजी खेळाडूंनी व्यक्त केली आहे.