ऐसे जबरी विष, पिढी पिढी हो पोळली
हाडामासाची माणसं, कशी ना दिसली
वाडे जातीपातीचे, तू तोडत फोडत यावं
तू यावं, तू यावं… बंधन तोडीत यावं…
दिवंगत शाहीर शंतनू कांबळे यांच्या शाहिरीच्या ओळी खऱ्या आयुष्यात अनुभवल्या त्या निलेश आणि सुचरिता यांनी… ते दोघे इयत्ता सातवीमध्ये पंढरपूर येथे एकाच शाळेत शिकायला होते. त्यानंतर सुचरिता काही वर्षे पुण्यात वास्तव्यास होती. नंतर ती कोल्हापूरला स्थायिक झाली. २०११-१२ मध्ये ते दोघेही फेसबुक आणि फोनच्या माध्यमातून संपर्कात आले आणि शाळेतील प्रेम पुन्हा बहरायला लागले. ही गोष्ट आहे पंढरपूच्या निलेश पवार आणि बीडच्या सुचरिता कोरडे यांची. दोन जातीमधील टोकाच्या तिरस्काराला झुगारून यांचं प्रेम कसं जिंकलं याचीच ही कथा…!
निलेश २०१२ साली पुण्यात शिकायला होता. तेव्हा सुचरिता कोल्हापूर येथे राहायला होती. त्यादरम्यान निलेश आणि सुचरिता यांनी जानेवारी २०१४ मध्ये कोल्हापूर येथे एकमेकांना भेटायचं ठरवलं. जवळपास ७ वर्षांनंतर ते भेटणार होते. निलेशने मित्राला सोबत घेऊन १८ जानेवारी २०१४ रोजी कोल्हापूरला दुचाकीवर जाण्याचे ठरवले. या दिवसाची पण गंमतीशीर आणि चांगली आठवण आहे. गंमतीशीर अशी की निलेश आणि त्याच्या मित्राने सकाळी ६ वाजता पुण्यातून निघायचं ठरवलं होतं. निलेश उत्साही असल्यामुळे वेळेत तयार झाला. परंतु त्याचा मित्र पुण्यात दुसऱ्या ठिकाणी राहायला होता आणि तो वेळेत न उठल्यामुळे निघायला ७.३० वाजले, त्यात दुचाकी कात्रज बोगद्यामध्ये बंद पडली. तिथून दुचाकी ढकलत जवळपास ४-५ किलोमीटर चालले. असा एकंदरीत मजेशीर प्रवास करत कोल्हापूर मध्ये दुपारी १-२ वाजता हे पोहचले. ही यांची तशी पहिलीच भेट म्हणू शकतो. यादिवशी हे दोघे भेटले. त्यामुळे नंतर लग्न करताना याच दिवशी लग्न करायचं अस त्यांनी ठरवलं आणि १८ जानेवारी २०१८ रोजी निलेश सुचरिता विवाहबद्ध झाले.
१८ जानेवारी २०१८ रोजी निलेशने सुचरिता कोरडे हिच्याशी विवाह केला. हा आंतरजातीय विवाह आहे. निलेश मराठा समाजाचा असून सुचरिता दलित समाजातली आहे. सुरुवातीच्या काळात त्यांच्या विवाहास दोन्ही कुटुंबियांकडून विरोध होता. गेल्या दीड वर्षांपासून सुचरिताच्या कुटुंबियांकडून त्यांच्या लग्नाचा स्वीकार केला गेला असून निलेशच्या घरून अजूनही विरोध कायम आहे.
लग्नाचा विचार केव्हा केला त्याबद्दल निलेश सांगतो, “२०१५ पासून सुचरिता पुण्यात शिफ्ट झाली. आमच बोलणं-भेटणं नियमित होऊ लागलं. २०१६ मध्ये तिने एमबीएसाठी ऍडमिशन घेतलं तर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. माझं शिक्षण पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमधून झालं. दोघेही करिअर सेटल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत होतो. जस-जसा वेळ जात गेला, तसे आम्ही एकमेकांना चांगलं समजून घेऊ शकलो आणि त्यातून आम्ही पुढे भविष्यामध्ये जेव्हा कधी लग्न करण्याची वेळ येईल, तेव्हा आपण आपापल्या घरी बोलू अस ठरवलं”.
“२०१८ च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुचरिताला लग्नासाठी स्थळ आल्यामुळे तिच्या घरून तिला लग्न करण्यासाठी समजावणे सुरू झाले. त्यावेळी आम्ही दोघांनी असं ठरवलं की आपण अगोदर लग्न करून ठेऊ, परंतु ते घरी सांगायला नको आणि घरचे जेव्हा कधी तयार होतील, तेव्हा ते म्हणतील त्या पद्धतीने कार्यक्रम घेऊ. कारण दोघांच्याही घरून लग्नाला विरोध होईल”
ठरल्याप्रमाणे आम्ही १८ जानेवारी २०१८ रोजी काही मित्रांसमवेत आळंदी येथे विवाहबद्ध झालो. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या घरी समजावण्याचा प्रयत्न सुरू केला. दोघांचेही वडील रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून असल्याने त्यांचा एकमेकांशी परिचय होता. परंतु तरी देखील दोघांच्याही वडिलांनी आमच्या विचारास विरोध दर्शविला.
दोन्हीही कुटुंबीयांनी पाठिंबा काढून घेतल्याने निलेश आणि सुचरिता यांना शून्यातून सुरुवात करावी लागली. पहिलं चॅलेंज होत ते जॉब शोधण्याचं आणि जॉब मिळेपर्यंत आर्थिक बाजू सांभाळण्याची. त्यावेळी मित्रांनी आर्थिक मदत केली आणि पुण्यातील एक गृहस्थांनी राहायला जागा दिली. काही महिन्यात दोघांनाही नोकरी लागली आणि त्यानंतर भाड्याचं घर घेऊन नवदाम्पत्य राहू लागलं.
पहिल्याच वर्षीच्या म्हणजे २०१८ च्या दिवाळी दरम्यान नवदाम्पत्यासमोर प्रश्न पडला की आजपर्यंत आपण दिवाळीला आपल्या घरी गेलो पण यावर्षी आपण कुठे जाणार? तर त्याही वेळी त्यांच्या एक मित्राने त्यांना दिवाळीसाठी त्यांच्या घरी बोलावलं. असं दरवर्षी वेगवेगळ्या मित्रांनी त्यांना सणावेळी त्यांच्या घरी बोलावून घरच्यांची कमी भरून काढली. नंतरचा अवघड टप्पा होता तो कोरोना काळातला. कोरोना काळात त्यांनी पुण्यातील सर्वजण आपापल्या गावी जाताना पाहिले होते. परंतु निलेश सुचरिता पुण्यातच अडकले. त्यादरम्यानही त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांची दखल घेतली गेली नाही, असं सांगताना निलेश आणि सुचरिता दोघेही भावुक झाले होते.
लग्न केल्यापासून सुचरिताच्या घरून तिच्या आईसोबत तिचा संपर्क सुरू होता. त्यांच्यामध्ये या विषयाला घेऊन वाद व्हायचे परंतु त्यांच्याशी संभाषण कायम सुरू राहिलं होतं. अशामध्ये जून २०२१ मध्ये सिचरिताच्या आईची बदली पुण्यात झाल्याचं निलेशला समजलं. दोघांनी एके दिवशी अचानक त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी भेटायला जायचं ठरवलं. भेटायला गेल्यानंतर सुचरिता आणि तिची आई दोघीही इमोशनल झाल्या आणि बसून सगळ्या गोष्टींबद्दल बोलणं झालं. त्यानंतर सुचरिताच्या आईने तिच्या घरी सगळ्यांना समजावून सांगितलं. काही दिवसांतच सुचरिताच्या घरचे निलेशशी बोलू लागले. आता त्यांच्यासोबत निलेशचे चांगले संबंध झाले आहेत. पण दु:खाची गोष्ट म्हणजे, निलेशची आई-वडील-भाऊ-बहीण त्याच्या कसलेच संपर्कात नाहीत.
आम्ही दोघेही पुण्यात नोकरी करतो. दोघेही एकमेकांसोबत खूप खुश आहोत. या व्हेंलेटाईन डे च्या निमित्ताने आम्ही आमच्यासारख्या तरुण-तरुणींना हाच संदेश देऊ इछितो की प्रेमाने जग जिंकता येतं म्हणतात ते खरंच आहे. आम्ही आत्ता जेव्हा मागे वळून सगळ्या घडामोडींकडे पाहतो, तेव्हा एवढी हिम्मत आपण कसे काय करू शकलो, असा विचार डोक्यात येतो. तेव्हा त्याला एकच उत्तर मिळतं- एकमेकांवर असलेलं प्रेम आणि विश्वास. ठाम निर्णय घेऊन तो निर्णय अंमलात आणण्यासाठी लागणारी क्षमता तुमच्यात असते, तुम्हाला फक्त ती ओळखावी लागते, असं निलेश सरतेशेवटी सांगतो.