वाघोलीतील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मार्च २०१५ साली दोघांची भेट झाली. पहिल्याच भेटीत नजरेला नजर भिडली पण बोलायचं कसं? काहीही समजत नव्हतं. अखेर निखिलाने मेसेज केला आणि बोलण्याचा सिलसिला सुरू झाला. निखिलाचा शांत, समुजतदार आणि मनमिळावू स्वभावाच्या निलेश प्रेमात पडला आणि प्रपोज केलं. निखिलाने वेळ घेतला आणि अखेर निलेशच्या निस्वार्थी प्रेमाचा स्वीकार केला.
असेच दिवस जात होते. दोघांचे शिक्षण पूर्ण झाले. आता दोघेही आपलं करिअर घडविण्यात व्यस्त होते. निखिलाला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. पण निलेश अजूनही चांगल्या नोकरीच्या शोधात होता. इकडे निखिलाला नोकरी मिळून बरेच दिवस झाल्याने घरी आई वडिलांनी स्थळं पाहण्यास सुरवात केली होती. मात्र निलेश अजूनही चांगल्या नोकरीच्या शोधात असल्याने निखिला ठामपणे काही सांगू शकत नव्हती. घरी अनेक मुलं येऊन जात होती. निखिलाने निलेशच्या प्रेमाखातीर मुलांना नकार देण्याचा रेकॉर्ड केला. सुमारे ७०-८० मुलांना निखिलाने नकार दिला. असेच दिवस जात होते. दोघेही एकमेकांपासून दूर होते.
इतक्यात संपूर्ण जग ठप्प करणारा कोरोना आला आणि लॉकडाऊन सुरू झाले. दोघांची भेट तब्बल दोन वर्षे होऊ शकली नाही. मात्र प्रेम कणभर देखील कमी झालं नव्हतं. या काळात बऱ्याच घडामोडी घडत होत्या. कोरोना काळात निलेशचे घर पूर्ण कोलमडले होते. घराचा मुख्य आधार असलेले निलेशच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाले. निलेशच्या आयुष्यात भयंकर वादळं आली होती. तो पूर्णपणे कोलमडला होता. तिकडे निखिलाला लग्न करण्यासाठी दबाव वाढत होता. आल्या दिवशी मुलांना नकार देणे हा तिचा नित्य नियम बनला होता.
नाही म्हणवयाला आता असे करू या
प्रणात चंद्र ठेऊ- हाती चंद्र धरू या!
आता परस्परांची चाहूल घेत राहू…
आता परस्परांच्या स्वप्नात वावरू या!
नेले जरी घराला वाहून पावसाने,
डोळ्यातल्या घनांना हासून आवरूया !
गेला जरी फुलांचा हंगाम दूरदेशी,
आयुष्य राहिलेले जाळून मोहरुया !
ऐकू नकोस काही त्या दूरच्या दिव्यांचे…
माझ्या तुझ्या मिठीने ही रात्र मंतरुया !
हे स्पर्श रेशमी अन् हे श्वास रेशमाचे…
ये… आज रेशमाने रेशीम कातरूया !
कवी सुरेश भटांच्या या ओळीप्रमाणे निखिला आणि निलेशच्या आयुष्याचं झालं होतं. अखेर निखिलाने धाडस केले आणि सगळं प्रकरण घरी सांगितलं… आता मुलं दाखवणं बंद करा… मी लग्न करणार तर निलेशशीच…!
तोपर्यंत इकडे निलेश देखील चांगल्या कंपनीत नोकरीला लागला होता. निखिला देखील हट्टाला पेटली होती. वडील गेल्यावर निलेशवर घरची सगळी जबाबदारी असल्याने तो कामात मग्न झाला होता. अशावेळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले निलेश निखिला या संकटाच्या काळात मनाने अधिक जवळ आले. निखिलाने फक्त तिच्याच नाही तर निलेशच्या घरच्यांच्या मनात देखील आपल्या मनमिळावू स्वभावाने घर केलं आणि शेवटी दोन्ही घरचे लग्नाला तयार झाले. मे २०२२ मध्ये मोठ्या धुमधडाक्यात निखिला-निलेशने लग्न केले. आता दोघेही पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरी करत असून सर्वच आनंदात सुरू आहे.