म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगर : गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनेलचा पराभव करत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कृष्णा डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनेलने विजय मिळवला. बंब यांच्यासह त्यांच्या सर्व उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला.
गंगापूर तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीने काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले होते. या कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज असून, अनेक वर्षांपासून बंद असणारा हा कारखाना सुरू करून दाखवू, असे आश्वासन दोन्ही बाजूंकडून देण्यात आले होते. निवडणुकीतील एक जागा बिनविरोध आली होती, तर उर्वरित २० जागांसाठी प्रशांत बंब यांचे सभासद कामगार विकास पॅनेल व कृष्णा डोणगावकर यांचे शिवशाही शेतकरी विकास पॅनेलचे एकूण ४० उमेदवार रिंगणात होते. रविवारी झालेल्या मतदानात एकूण ५४ टक्के मतदान झाले. एकूण १४ हजार ६६ मतदारांपैकी सात हजार ५९८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतमोजणीला सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आणि सुरुवातीपासून कृष्णा डोणगावकर यांचे शिवशाही शेतकरी पॅनेल आघाडीवर होते. कृष्णा डोणगावकर, संजय जाधव, सुरेश मनाळ, प्रवीण वालतुरे, कचरू शिंदे, बाबुलाल शेख, मधुकर साळुंके, शेषराव साळुंके, अप्पासाहेब गावंडे, मनोहर दुबिले, प्रल्हाद निरफळ, तुकाराम कुंजर, शेषराव पाटेकर, दिलीप बनकर, कारभारी गायके, दादासाहेब जगताप, काशिनाथ गजहंस, माया दारुंटे, शोभा भोसले, नामदेव दारुंटे, देवचंद राजपूत हे संचालक निवडून आले. निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर डोणगावकर समर्थकांनी घोषणा देत गुलाल उधळून फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करून विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली.
बंब यांची जादू चालली नाही
या निवडणुकीमुळे गंगापूर तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले होते. आमदार प्रशांत बंब व कारखान्याचे माजी अध्यक्ष कृष्णा डोणगावकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत बंब यांना धक्का देत कृष्णा डोणगावकरांनी कारखान्यावर आपले वर्चस्व निर्माण केले. तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत आपल्या बाजूने निकाल खेचणारे आमदार बंब यांची जादू चालली नाही. त्यांच्यासह पॅनेलच्या सर्व उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. या निकालामुळे भविष्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मागील तेरा वर्षांपासून आमदार प्रशांत बंब यांनी तालुक्यातील जनतेला फक्त आश्वासने दिली; काहीही कामे केले नाही. या निकालामुळे माझी जबाबदारी वाढली असून, हा विजय सभासद मतदार व शेतकऱ्यांचा आहे. कारखाना सुरू करत नाही, तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही,असं शिवशाही शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख कृष्णा डोणगावकर यांनी म्हटलं आहे.
प्रणितींना विरोध अन् रोहित पवारांचं समर्थन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची पक्षातून थेट हकालपट्टी