भरधाव वेगात जाणाऱ्या माल वाहतुकीच्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात १० ते १२ चारचाकी वाहनांचे नुकसान झालं आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथील पुलाजवळ घडला. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातात काही वाहनांचं किरकोळ, तर काही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरहून अहमदाबादकडे कपडे घेऊन निघालेला ट्रक वडगाव बुद्रुक येथील पुलावरून खाली येत होता. यावेळी ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
दरम्यान सकाळची वेळ असल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी होती. यात १० ते १२ चारचाकी वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र ग्रामीण पोलिसांच्या वाहनाचेही या अपघातात मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, वारजे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल पवार, पोलीस उपनिरीक्षक मुकेश कुरेवाड व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.
कार्यकर्त्यांना त्रास होतोय, दहशत जास्त दिवस राहणार नाही, जिद्दीने लढू : बाळासाहेब थोरात