बापरे! नांदेडच्या अल्पवयीन मुली व्हॅलेंटाईन डेसाठी जालन्यात, दामिनी पथकाची नजर पडली…

जालना: काही अल्पवयीन मुली नांदेडहून जालन्यात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी आल्या होत्या. आपल्या मित्रांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी या अल्पवयीन मुली आल्या असल्याची माहिती आहे. जेव्हा पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली तेव्हा त्यांना या अल्पवयीन मुलींच्या पालकांना बोलावून घेतलं आणि मग समज देऊन त्यांना पालकांच्या हवाली केलं. जालन्यातील दामिनी पथकाने ही कामगिरी केली आहे.

जालना येथील दामिनी पथकाच्या प्रभारी पोलीस उपनिरीक्षक रंजना पाटील यांनी व्हॅलेंटाईन डे निमित्त पथकासह सतर्क राहून शहरात ठिकठिकाणी पेट्रोलिंग केली. यावेळी शहरात विविध ठिकाणी आढळून आलेल्या १३ मुला-मुलींना दामिनी पथकाने समज देत घरी पाठवल्याचे कळते आहे.

यावेळी जालना शहरातील प्रसिध्द असलेल्या संभाजी महाराज उद्यान परिसर, मोतीबाग चौपाटी, रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि विविध महाविद्यालयाच्या परिसरात पेट्रोलिंग करीत असताना व्हॅलेंटाईन डे निमित्त फिरणाऱ्या टवाळखोरांना पथकाने चांगलीच समज दिली आहे. मिळून आलेल्या १३ प्रेमवीरांना समज देऊन सोडून देण्यात आले आहे.

तसेच, नांदेड येथील नामांकित कलास मध्ये शिकणाऱ्या ४ अल्पवयीन मुली जालना येथे व्हॅलेंटाईन डे मित्रांसोबत साजरा करण्यासाठी आल्याची माहिती या पथकाला मिळताच पथकाने या चारही अल्पवयीन मुलींना रेल्वेस्थानक परिसरात ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्या चौघी परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या असल्याचे समजले. त्यानंतर जिंतूर येथून पालकांना बोलावून, त्या अल्पवयीन मुलींना सुखरूप स्वाधीन करण्यात आले असल्याची माहिती दामिनी पथकाच्या प्रभारी पोलीस उपनिरीक्षक रंजना पाटील यांनी दिली आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक रंजना पाटील, सहायक फौजदार रवी जोशी, संजय गवळी, आरती साबळे, रेणुका राठोड, चालक संजय कुलकर्णी यांच्या पथकाने आज ही कारवाई केली आहे.

Source link

damini pathakminor girlsminor girls celebrating valentines dayminor girls newsnanded minor girls in jalnaValentine's Dayvalentines day celebrationजालनादामिनी पथकव्हॅलेंटाईन डे
Comments (0)
Add Comment