राज्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण; राजेश टोपे म्हणतात…

हायलाइट्स:

  • पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात झिकाचा रुग्ण
  • केंद्र सरकारचे पथक पाहणीसाठी दाखल
  • झिकामुळं घाबरून जाऊ नये – राजेश टोपे

मुंबई: करोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरली नसतानाच महाराष्ट्रात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळं चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ‘झिका व्हायरसमुळं घाबरून जाऊ नये. या आजाराचं संक्रमण झालेलं नसून त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत उपाययोजना सुरू आहेत,’ अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात बेलसर येथे झिका विषाणूचा रुग्ण आढळला आहे. एका ५० वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली असून हा राज्यातील पहिला रुग्ण आहे. त्यामुळं आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. झिकाचा रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून तीन सदस्यांचं पथक पाहणीसाठी आलं आहे. या भागात डासांच्या उत्पत्तीची ठिकाणं नष्ट करण्यावर भर देण्यात येत असून लक्षणानुसार उपचार केले जात आहेत, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

करोना संसर्गाच्या सद्यस्थितीचीही त्यांनी माहिती दिली. ‘राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त असून या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं टोपे यांनी सांगितलं.

वाचा: ‘…म्हणून दरडग्रस्तांना दिलेले मदतीचे चेक परत घेतले’

या चारही जिल्ह्यात सध्या करोना रुग्णसंख्या राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा जास्त आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेमार्फत ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर अधिक भर दिला जात आहे. या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून जास्तीचे लसीकरण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहे.

करोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी करोना प्रतिबंध नियमांचे काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. जागतिक स्तरावर ज्या देशांमध्ये लसीकरण जास्त झाले, तेथे तिसरी लाट आली तरी तिचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं राज्यामध्ये अधिकाधिक लसीकरण करण्यावर भर देण्यात येत असून अखंडितपणे लस पुरवठ्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

वाचा: ‘मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेंचे पाय धरले का, हे महाराष्ट्राला समजायला हवं’

Source link

Rajesh Tope Latest Commentrajesh tope on coronavirusRajesh Tope On Zika VirusZika viruszika virus in maharashtraZika Virus News In MarathiZika Virus Updateझिका व्हायरसराजेश टोपे
Comments (0)
Add Comment