चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी; मध्य रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक; ‘या’ लोकल ट्रेन बंद

मुंबई : भिवपुरी रोड आणि कर्जत डाऊन मार्गावर मध्य रेल्वेने रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणारी शेवटची कर्जत लोकल आणि कर्जत येथून सुटणारी पहिली सीएसएमटी लोकल आज, बुधवारपासून पाच दिवस रद्द राहणार आहे. १९ फेब्रुवारीच्या पहिल्या लोकलपर्यंत हा बदल असेल.

कर्जत आणि भिवपुरी रोड या स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावरील रुळांमधील स्लीपर्सची दुरुस्ती आणि खडीची स्वच्छता करण्यासाठी बीएसएम मशिनच्या मदतीने काम करण्यात येणार आहे. भिवपुरी रोड ते कर्जत मार्गावर पहिल्यांदाच याचा वापर होणार आहे. यामुळे मध्यरात्री १.५० ते पहाटे ४.५० वाजेपर्यंत पाच दिवस ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटीहून कर्जतसाठी रात्री १२.२४ वाजता सुटणारी शेवटची लोकल आणि कर्जतहून सीएसएमटीसाठी निघणारी मध्यरात्री २.३३ची पहिली लोकल रद्द राहणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना कर्जतची शेवटची लोकल पकडून घरी जाता येणे शक्य होते. मात्र, ब्लॉकमुळे आगामी पाच दिवस लोकल रद्द राहणार असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. कर्जतहून पहिल्या लोकलने भाऊच्या धक्क्यावर मासे घेण्यासाठी आणि कामावर येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या प्रवाशांना पहिली लोकल एक तास विलंबाने उपलब्ध होणार आहे.

ब्लॉककाळातील वेळापत्रक

शेवटची लोकल : सीएसएमटी ते कर्जत – रात्री ११.३०

पहिली लोकल : कर्जत ते सीएसएमटी – पहाटे ३.४०

Source link

mumbai local block newsmumbai local newsMumbai local train newsmumbai marathi newsमुंबई मराठी बातम्यामुंबई लोकल ट्रेन बातम्यामुंबई लोकल बातम्यामुंबई लोकल ब्लाक बातम्या
Comments (0)
Add Comment