हायलाइट्स:
- राज्यात पावसाचं कमबॅक
- पुण्यासह ७ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून इशारा
- मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता
पुणे : राज्यात शांत झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. हवामान खात्याकडून तसा इशाराही देण्यात आला आहे. जुलै महिन्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांना पूर आला. जनजीवन विस्कळीत झालं, लोकांची घरे उद्ध्वस्त झाली. पण यानंतर आतापर्यंत मात्र पावसाने थोडीफार विश्रांती घेतली होती. पण आता पुन्हा एकदा पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रासह दक्षिण राज्यांमध्येही पावसानं उघडीप घेतली होती. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या तर उर्वरित दक्षिण भागात मात्र कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण वगळला राज्यात इतरत्र फारसा पाऊस झालेला नाही.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाने दडी मारली. पण ढगाळ वातावरणामुळे उष्णतेत वाढ झाल्याचे समोर आले. पण आज मात्र पुण्यासह, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक अशा ७ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
उद्या म्हणजेच गुरुवारी पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. खरंतर, यंदाच्या पावसाचा विचार केला तर राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आभाळ कोसळले तर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे महापूर आला आणि या ठिकाणी शेतीच्या शेती वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले. त्यामुळे या सगळ्यातून दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांपुढे अशात वरूण राजा पुन्हा शेतकऱ्यांना साथ देणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.