अर्पित एका लग्न कार्यक्रमासाठी पत्नीसोबत सोलापूरला आला होता. त्यावेळी त्याच्या पत्नीचं गंठण चोरीला गेलं होतं. अर्पित कपूरची पत्नी मेकअप करण्यासाठी रुममध्ये गेली होती. तेव्हा सोन्याचे मंगळसूत्र मेकअप टेबलासमोर ठेवले होते. मेकअप केल्यानंतर अर्पितची पत्नी श्रमिका मंगळसूत्र (गंठण) न घेताच घाई गडबडीत निघून गेली होती.
फौजदार चावडी पोलिसांनी १२ तासांत अर्पितच्या पत्नीचे दागिने शोधून काढले. मेकअप करणाऱ्या महिलेनेच गंठण लंपास केले होते. अर्पित कपूरने संशयित महिलेला माफ करून सोडून देण्याची विनंती केल्याने सदर संशयित महिलेवर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.
अर्पितने फौजदार चावडी पोलिसांना माहिती दिली
मंगळसूत्र (गंठण) विसरल्याची गोष्ट श्रमिका कपूर यांना तब्बल दोन तासानंतर लक्षात आली. परत रुममध्ये जाऊन पाहिल्यानंतर गंठण तिथे नव्हते. त्यानंतर तिने हरवलेल्या मंगळसूत्राचा शोध घेतला पण ते मिळाले नाही. यामुळे त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब सोलापूर शहरातील वेदा बँक्वेट या मंगल कार्यालयात जाऊन सीसीटीव्ही आधारे तपास सुरू केला.
मेकअप करणाऱ्या महिलेची कसून तपासणी
पोलिसांच्या चौकशीदरम्यान मेकअप करणाऱ्या महिलेवर त्यांचा संशय अधिक बळावला होता. चौकशीत सदर मेकअप करणाऱ्या महिलेनेच दागिने घेतल्याचे कबूल केले. अवघ्या काही तासातच घटनेचा तपास करत पोलिसांनी अर्पित कपूर यांच्याकडे हे दागिने सुपूर्द केल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
पोलीस गुन्हा दाखल करणार होते मात्र अर्पितने फिर्याद दिली नाही
फौजदार चावडी पोलिसांनी दागिने चोरलेल्या महिलेविरोधात तक्रार द्यायला सांगितले असता अर्पित कपूरने फिर्याद देण्यास नकार दिला होता. सदर महिला ही घटस्फोटीत आहे. तिला चार वर्षांची मुलगी आहे. सदर महिलेने चूक केल्याचे मान्य केले आहे. चोरीचा गुन्हा दाखल केला तर एखाद्याचे करिअर बरबाद होऊ शकते. त्यामुळे आपण तक्रार देत नाही आहेत. तिला माफ करा असे पोलिसांना विनंती केली. मात्र पोलिसांनी ज्या गतीने हा तपास केला ते पाहून आनंद झाल्याची भावना अभिनेता अर्पित कपूर आणि त्यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे.
मी घटस्फोट देणार नाही, योग्य शिक्षा मिळालीच पाहिजे; राखी ठाम