ठाणे महानगर पालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी आव्हाडांना धमकी दिल्याचा दावा NCP कार्यकर्त्यांकडून केला जातोय. व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमध्ये आव्हाड हा नाग आहे, त्याला ठेचायचं. त्याची मुलगी नताशाचा स्पेनमधला पत्ता शोधायला बाबाजीला सांगितलाय. शुटरही लावले आहेत. तसेच जावयाला शोधण्यासाठी त्याच्या आई बापावर अटॅक केला तर तो दोन दिवसात पळत येईल. जावयाची एअरपोर्ट पासून फिल्डिंग लावायला सांगतो. हा साप सत्तेत आला तर काहीही करेल. त्याने काही करायच्या आत मी ही सगळं तयार करून ठेवलंय… अशा प्रकारचं संभाषण व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये आहे.
जशीही ही ऑडियो क्लिप समोर आली तसे आव्हाड समर्थक प्रचंड आक्रमक झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि आव्हाड समर्थकांनी महेश आहेर यांना पालिका मुख्यालयाच्या बाहेर गाठले आणि जोरदार मारहाण केली. तसेच आव्हाडांच्या मुलीला तू मारणार का? अशी विचारणा करत त्यांना लाथाबुक्क्यांनी चोप दिला.
यावेळी महेश आहेर यांच्या सोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्ती करुन महेश आहेर यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. मारहाण झाल्यानंतर महेश आहेर यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी रवाना झाले. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
बाबाजी कोण आहे? पोलिसांनी शोध घ्यावा : जितेंद्र आव्हाड
याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना विचारणा केली असता ते म्हणाले, या ऑडिओमधील अनेक बाबी धक्कादायक आहेत. मी शूटर लावणार, मी त्यांना मारणार, मी त्यांना संपवणार, अशी भाषा या क्लिपमध्ये आहे. मी दिवसाला ४० लाख रुपये आणतो आणि २० लाख रुपये वाटतो. महापालिका म्हणजे आहे काय? मी बाबाजीला सांगेल, मी बाबाजीचा खास आहे. बाबाजी… शूटर हे सगळं काय आहे? नक्की हा बाबाजी आहे कोण? असे सवाल उपस्थित करत आव्हाडांनी संताप व्यक्त केला. हा बाबाजी कोण आहे? याचा शोध पोलिसांनी घ्यावा आणि त्यांना जर माहिती असेल तर त्यांनी याचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही आव्हाडांनी केला.