मतदार नसलेल्या सेनेचा कसा काय पाठिंबा घेतला? थेट प्रश्न, उत्तर देताना फडणवीसांची सारवासारव

पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेने आपला पाठिंबा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना दिला आहे. प्रचारात सक्रिय सहभाग घेणार नाही परंतु कार्यकर्ते पदाधिकारी भाजपला मदत करतील, असं मनसेकडून जाहीर केलं गेलं आहे. मनसेच्या भूमिकेचं भाजप नेत्यांनीही स्वागत केलं आहे. मात्र ज्या मनसे प्रमुखांना देवेंद्र फडणवीस यांनी हिणवलं, मतदार नसलेली सेना, उमेदवार नसलेली सेना म्हणून मनसेला डिवचलं, त्या मनसेचा पाठिंबा फडणवीसांनी कसा काय घेतला? अशी कुजबूज सध्या पुण्यात नाक्या-नाक्यावर ऐकायला मिळतीये.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होते. या भेटीत त्यांनी कर्करोगाशी लढा देणाऱ्या खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांना तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला. गिरीश बापट यांनी आजारपणामुळे कसब्याच्या प्रचारातून माघार घेतल्याने भारतीय जनता पक्ष काहीसा संकटात सापडला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक फारच चुरशीची होणार आहे. त्याचदृष्टीने आज फडणवीसांनी बापटांशी विस्ताराने चर्चा केली.

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट या दोन मोठ्या पक्षांसह विविध घटक पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना शिंदे गटासोबत अनेक छोट्या मोठ्या घटक पक्षांचा पाठिंबा आहे. महत्त्वाचं म्हणजे मंगळवारी रात्री उशिरा मनसेने भाजप उमेदवारांना पाठिंबा देत आपल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची फौज भाजपमागे उभी करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे बापटांच्या माघारीने संकटात सापडलेल्या भाजपला मोठा दिलासा मिळाला. मनसेच्या पाठिंब्यावर विविध प्रश्न उपस्थित होत असताना फडणवीसांनीच या प्रश्नांचं उत्तर दिलं.

कधीकाळी मनसेला तुम्ही मतदार नसलेली सेना, उमेदवार नसलेली सेना, असं म्हणून डिवचत होतात, त्यांच्यावर टीका करुन हिणवत होतात. मात्र आज तुम्हाला मनसेच्या पाठिंबाची का गरज पडली? तुम्ही मतदार नसलेल्या सेनेचा कसा काय पाठिंबा घेतला? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीसांनी सारवासारव केली.

ते म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीत सगळ्यांनाच मदत घ्यावी लागत आहे. महत्त्वाचं म्हणजे मनसेने आपली भूमिका हिंदुत्ववादी केली आहे. म्हणून हिंदुत्ववादी या ब्रॅकेटमध्ये जे कोणी असेल ते आम्हाला कधीही चालतात, असं उत्तर देऊन फडणवीसांनी वेळ मारुन नेली. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरानंतर मनसे यापूर्वी हिंदुत्ववादी नव्हती का? मनसेने यापूर्वी हिंदुत्ववादी भूमिका कधी घेतली नाही का? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारला जातोय.

Source link

chinchwad bypolldevendra fadanviskasba bypollkasba chinchwad bypoll electionmns supoort bjpकसबा पोटनिवडणूकदेवेंद्र फडणवीसराज ठाकरे
Comments (0)
Add Comment