मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार, २०० दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळणार; असा आहे सरकारचा प्लान

म. टा. खास प्रतिनिधीः समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्यासाठी मनोरी येथे उभारण्यात येणारा नि:क्षारीकरण प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाचा अभ्यास पूर्ण झाला असून, मार्च अखेरपूर्वी निविदा काढली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तीन ते चार वर्षांत पूर्ण केला जाणार आहे.

मुंबईला सात धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीही वाढत आहे. त्यातच एखाद्या वर्षी पाऊस कमी पडल्यास मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत असल्याने वाढत्या लोकसंख्येची गरज भागवणार कशी असा प्रश्न पडतो. मुंबईला दैनंदिन लागणारी पाण्याची गरज, दिवसाला २५ ते ३० टक्के होणारी पाणी गळती आणि चोरी पाहता मुंबईकरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यापेक्षाही तुलनेने कमी पाणी मिळते. नि:क्षारीकरण प्रकल्पामुळे अधिकच्या पाण्याची गरज भागणार आहे.

पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने मनोरी येथे १२ हेक्टर जागेवर समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्यासाठी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पाची संकल्पचित्रे, आरेखन तसेच बांधकामाचे पर्यवेक्षण यासह अन्य अभ्यास पूर्ण झाला आहे. मात्र गेल्या वर्षभरापेक्षा यंदा प्रकल्प अधिक चर्चेत असतानाच मुंबई महापालिकेकडून त्याला गती देण्यात येत आहे. याविषयी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही, मनोरी येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी मार्च अखेरपूर्वी निविदा काढण्यात येणार आहे, असे स्पष्ट केले.

सन २०२२च्या सुरुवातीला पालिकेच्या स्थायी समितीकडून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. त्यानंतर मे, २०२२मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गोरेगाव येथील एका कार्यक्रमात ‘सर्वांसाठी पाणी’धोरण या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता.

‘समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून दररोज २०० दशलक्ष लिटर गोडे पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. प्रकल्पाचा अंदाजित खर्च अडीच हजार कोटी रुपये असून, येत्या तीन ते चार वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. – पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), मुंबई महापालिका

Source link

BMC Budget 2023BMC’s desalination plant projectDesalination plant in mumbaidesalination sea water project in mumbaiखारे पाणी गोडे होणार
Comments (0)
Add Comment