कसबा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी फडणवीस स्वत: मैदानात; पुण्यात भाजपचा ‘रात्रीस खेळ चाले’

Authored by अभिजित दराडे | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Feb 2023, 10:15 am

Kasba Byelection in Pune: कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरु आहे. अशातच आता देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागून सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांची भेट घेतली आहे.

 

कसबा पोटनिवडणूक

हायलाइट्स:

  • मानाच्या गणपती मंडळांच्या अध्यक्षांची भेट
  • कसब्याची सूत्रं फडणवीसांनी हाती घेतली
पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने टिळकांच्या घरात उमेदवारी न देता हेमंत रासने यांना मैदानात उतरवलं आहे. तेव्हापासूनच भाजपला पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसत आहे. इतकंच नाही तर भाजपचा पारंपारिक मतदार समजला जाणारा ब्राम्हण समाज देखील भाजपवर नाराज असल्याचा चर्चा कसब्यात आहेत. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून आपली एकहाती सत्ता असणारा कसबा हातातून कोणत्याही परिस्थितीत जाऊ द्यायचा नसल्याने स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रिंगणात उतरले आहेत.

आधीच भाजपचे बडे नेते आधीच कसब्यात तळ ठोकून बसले असताना आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी देखील कसब्याच्या मैदानात उडी घेतली आहे. काल देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी कसब्याच्या विजयाचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची चर्चा सुरु आहे. फडणवीस यांनी आधी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. २५ वर्षे कसब्यात भाजपचे कमळ फुलवणारे बापट हे आपल्या आजारपणामुळे निवडणुकीपासून दूर आहेत. अशात या भेटीनंतर ‘कसबा मतदारसंघात प्रचार कसा केला पाहिजे, या संदर्भात बापटांनी टिप्स दिल्या आहेत. त्यांचे लक्ष या निवडणुकीकडे आहे’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना शब्द पण आता प्रचारातून माघार, कसब्याचा वाघ ‘घायाळ’!
या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातच येत असलेल्या मानाच्या पाच गणेश मंडळांच्या अध्यक्षांची भेट घेतली आहे. त्यासोबतच पुण्यातील बडे उद्योगपती असणारे पुनीत बालन आणि फत्तेचंद रांका यांचीदेखील भेट फडणवीस यांनी भेट घेतली आहे. फत्तेचंद रांका यांच्या व्यापारी संघटनेत जवळपास ४० हजारापेक्षा जास्त व्यापारी आहेत. त्यातील सर्वात जास्त हे कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील आहेत. तर पुनीत बालन हे यांचं नावं पुण्यातील सामाजिक कार्यात सध्या अग्रस्थानी घेतलं जातं. उद्योजक असल्यासोबतच पुनीत बालन सामाजिक क्षेत्रात मोठे काम करत असतात. त्यासोबतच या दोघांची आर्थिक ताकद खूप मोठी आहे.
जे हेमंत रासने मुक्ता टिळकांच्या मरणाची गिधाडाप्रमाणे वाट पाहत होते, त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली: काँग्रेस
भाजपचे शिवाजीनगर मतदारसंघातील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या घरी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री उशिरा एक बैठक पार पडली आहे. या बैठकीला भाजपचे तब्बल पाच मंत्री उपस्थित होते. तब्बल सात तास चाललेल्या या बैठकीत कसबा आणि चिंचवड मतदार संघात विजयाचा मास्टर प्लॅन काय असणार ? यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यासोबतच अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याचे नियोजन देखील या बैठकीत झाले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Devendra Fadnavisfattechand rankakasba bypollMaharashtra politicsmanache ganpati in punepune local newsकसबा पोटनिवडणूकदेवेंद्र फडणवीस कसबा
Comments (0)
Add Comment