मुंबईमध्ये मनसे पुणे शहर कार्यकारिणीची राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मनसेने भाजपला पाठिंबा द्यायचा, मात्र प्रचारात सहभागी व्हायचं नाही असा निर्णय झाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मनसेला चांगलंच फैलावर घेतलं. ‘कोथरूड मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देतात. बोल घेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत’ असं जगताप यांनी म्हटलंय
जगताप इतक्यावरच थांबले नाहीत तर ‘साहेब किती दिवस तुम्ही दुसऱ्यांच्या वरातीत सुपारी घेऊन नाचणार? कधीतरी तुम्ही घोड्यावर बसा-एक मंदसैनिक’ असं ट्विट केलं. प्रशांत जगताप यांचा हा हल्लाबोल सुरू असतानाच मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी प्रशांत जगताप यांना जशाच्या तसे उत्तर दिले. ‘लग्न लोकाचं प्रशांत जगताप नाचतंय येड्या भो..चं’ असं ट्विट करत साईनाथ बाबर यांनी प्रशांत जगताप यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. पण हे ट्विटर वॉर इतक्यावरच थांबलं नाही. साईनाथ बाबर यांच्या ट्विटला रिप्लाय करत प्रशांत जगताप म्हणाले, ‘साईनाथ, साहेबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा ? शुद्धीवर ये तुझ्या साहेबांनी सुपारी घेतली आहे. तू फक्त मन लावून नाचायचं काम कर.’
प्रशांत जगताप आणि साईनाथ बाबर यांच्या ट्विटर वॉर नंतर पुण्याच्या राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. पुण्यात निवडणुकीत लढाई दुसऱ्याचीच आणि भांडतंय तिसरच असं चित्र निर्माण झालंय.
दरम्यान, पुण्यात कसब्यासाठी मनसेकडून गणेश भोकरे आणि अजय शिंदे हे इच्छुक होते. कसब्यात याआधी मनसेने 2009, 2014 आणि 2019 या तीन विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. 2009 आणि 2014 मध्ये मनसेकडून सध्याचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी गिरीश बापट यांना चांगली टक्कर दिली होती. मात्र 2019 च्या निवडणुकीत मनसेच्या अजय शिंदे यांना केवळ आठ हजार इतके मतं मिळाली होती. मात्र, असं असलं तरी कसब्यामध्ये मनसेचं संघटन उत्तम आहे. त्यामुळे भाजपला मनसेच्या पाठिंबाचा निश्चित फायदा होऊ शकतो.